मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – सहा हजाराची लाच घेताना दोन व्यक्तींना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. संतोष सोनू पाताडे आणि देवेंद्र चंद्रकांत बांदवडकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदाराची टोईंग कार सोडविण्यासाठी आधी दहा हजार सातशे रुपयांची मागणी केली होती, मात्र चर्चेअंती सहा हजार घेण्याची तयारी दर्शविली होती. लाचेची ही रक्कम घेताना या दोघांवर सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. लाचेची मागणी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे.
यातील तक्रारदाराच्या मालकीची एक सुझुकी वॅगनार कार असून ती कार १४ जुलैला महानगरपालिकेकडून टोईंग करण्यात आली होती. ही कार सोडविणसाठी त्यांचे प्रयत्न सुरु असताना तंची संतोष पाताडे आणि देवेंद्र बांदवडकर यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांची कार सोडविण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजार सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी सहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी संतोष पाताडे आणि देवेंद्र बांदवडकर यांच्याविरुद्ध २३ जुलैला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी या दोघांनी त्यांच्याकडून कार सोडविण्यासाठी आधी दहा हजार सातशे रुपयांची मागणी केली होती, मात्र चर्चेअंती सहा हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार सहा हजार रुपये घेऊन दोन्ही आरोपींना भेटण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी त्यांना सहा हजार रुपये दिले, मात्र त्यांनी त्यांना कुठलीही शासकीय पावती दिली नाही. त्यामुळे सहा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी संतोष पाताडे आणि देवेंद्र बांदवडकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल हारुगडे, पोलीस निरीक्षक रेखाबई दुधमाते यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.