सरकारी नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हॉस्पिटलच्या निवृत्त सिस्टरसह सहाजणाची ६८ लाखांची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२६
मुंबई, – सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुक केल्याप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश जगन्नाथ पाटणकर आणि सूर्यकांत निवृत्ती मगरे अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी जी. टी हॉस्पिटलच्या निवृत्त सिस्टरसह सहाजणांची ६८ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कलावती जया पुजारी ही ६० वर्षांची वयोवृद्ध महिला न्यू पनवेल येथे राहत असून जी. टी हॉस्पिटलमधून सिस्टर इंचार्ज म्हणून निवृत्त झाली होती. हॉस्पिटलमध्ये काम करताना ती कर्मचार्यासाठी असलेल्या स्टाफ वसाहतीमध्ये राहत होती. सूर्यकांत मगरे हा तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये काम करत होता, तसेच तिच्या शेजारीच स्टाफ वसाहतीत राहत होता. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. चौदा वर्षांपूर्वी कलावतीच्या मुलाने बीएसी बायोटेकचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणासाठी तो नोकरीच्या शोधात होता. याच दरम्यान सूर्यकांतने त्याचा एक मित्र योगेश पाटणकर हा मंत्रालयात कामाला असून त्याची तिथे चांगली ओळख आहे.
त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी मिळवून दिली होती. त्यासाठी तो ठराविक रक्कम कमिशन म्हणून घेत असल्याचे सांगितले होते. मुलाला सरकारी नोकरी मिळत असल्याने तिने त्याच्यासोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल २०१४ रोजी त्यांची तिच्या राहत्या घरी एक मिटींग झाली होती. यावेळी योगेशने तिच्या मुलाला मंत्रालयात वरिष्ठ लिपीक म्हणून नोकरीचे आश्वासन दिले होते. त्यासाठी किमान पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. तिने होकार दर्शवून त्याला पाच देण्याचे मान्य केले होते. ठरल्याप्रमाणे तिने त्याला टप्याटप्याने पाच लाख रुपये दिले. मात्र त्याने तिच्या मुलाला नोकरी दिली नाही.
विचारणा केल्यानंतर त्याने तिला सरकारी काम लवकर होत नाही, थोडा धीर धरा, तिच्या मुलाला लवकरच नोकरी मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर एक ते दिड वर्ष ती नोकरीसाठी पाठपुरावा करत होती. मात्र त्याने तिच्या मुलाला नोकरी दिली नाही. सतत विचारणा होत असल्याने योगेशने तिच्या मुलाला मेडीकलसाठी खोपोलीच्या जुना मुंबई-पुणे हायवेजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले होते. तिथे तिला काही उमेदवार त्यांच्या पालकांसोबत आल्याचे दिसून आले. त्यांनाही योगेशने सरकारी नोकरीचे आमिष दाखविले होते. या नोकरीसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. तिच्यासह इतर सहा उमेदवाराकडून योगेशने ६८ लाख ५० हजार रुपये घेतले होते,
मात्र बारा वर्ष उलटूनही त्यांनी कोणालाही नोकरी दिली नव्हती. प्रत्येक वेळेस तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही. त्यामुळे तिने घडलेला प्रकार आझाद मैदान पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योगेश पाटणकर आणि सूर्यकांत मगरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तक्रारदार वयोवृद्ध महिलेसह सहाजणांची ६८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पोलिसांना सहाजणांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले असून ज्या व्यक्तींची संबंधित आरोपीकडून फसवणुक झाली आहे, त्यांनी आझाद मैदान पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.