मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२६
मुंबई, – कांदिवलीतील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने सुमारे पंधरा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार वर्षांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे याच महिलेच्या घरी एप्रिल २०२६ रोजी दुसर्यांदा चोरी झाली होती, याच गुन्ह्यांत सोसायटीतील एका महिलेला पोलिसांनी अटक करुन तिच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता, त्यामुळे या गुन्ह्यांत तिचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करुन या महिलेने तिच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केल्याचे बोलले जाते.
मोहीनी श्रीकृष्ण चौधरी ही महिला कांदिवलीतील चारकोप, सेक्टर आठ, माऊली कृपा सोसायटीमध्ये राहते. २०१४ ते २०२५ या कालावधीत तिचे पती श्रीकृष्ण हे आफ्रिका देशातील रुबाटेक ड्रिलिंग कंपनीत ड्रिलिंग मॅनेजर म्हणून कामाला होते. जानेवारी २०२५ पासून ते ओमान देशातील एका खाजगी कंपनीत काम करतात. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी तिचा मुलगा कौस्तुभ हा शाळेत तर पुतण्या हर्षद हा कामावर निघून गेला. दुपारी एक वाजता ती स्वत भाईंदर येथे कामानिमित्त गेली होती. यावेळी तिने कपाटातील सर्व सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री केली होती. त्याच दिवशी तिचे पती विदेशातून मुंबईत आले होते.
२८ नोव्हेंबरला त्यांना एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातील सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला काही काही दागिने सापडले नाही. तिने सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला १५ लाख ३४ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने सापडले नाही. तिच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने सोसायटीच्या पदाधिकार्यांना ही माहिती सांगून सीसीटिव्ही फुटेज तपासून घेण्याची विनंती केली. मात्र त्यात तिच्या घराकडील रेकॉडिंग नव्हते. या चोरीमागे घरातील लोकांवर तिचा संशय असल्याने तिने पोलिसांत तक्रार केली नव्हती.
ही चोरीची घटना ताजी असताना १२ एप्रिल २०२६ रोजी तिच्या घरी पुन्हा चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश करुन सुमारे २४ तोळे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे तिने चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले होते. ते दागिने नंतर तिला परत करण्यात आले होते. त्यामुळे तिने २०२२ तिच्या घरी झालेल्या चोरीची पुन्हा तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चार वर्षांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
एप्रिल महिन्यांत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी तिच्या सोसायटीमध्ये राहणार्या पल्लवी मनोज जाधव या महिलेस पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे २०२२ साली झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांत तिचा सहभाग असल्याचा आरोप तिने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत पल्लवी जाधवची पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा आता चारकोप पोलिसांकडून नव्याने तपास सुरु आहे.