पत्नीच्या चारित्र्यावरुन दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – पत्नीच्या चारित्र्यावरुन झालेल्या वादातून दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच पित्याने पाण्यात बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोराई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच बंटी कालिदास राव या ३८ वर्षांच्या आरोपी पित्याला गोराई पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मुलाच्या मिसिंग तक्रारीवरुन या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बुधवारी २९ जुलैला गोराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलवेम बिच समुद्रकिनार्‍याावर पोलिसांना एक अज्ञात मुलाचा मृतदेह सापडला होता. मृत मुलाचे वय अंदाजे दहा ते तेरा वर्ष होते, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हता. त्यामुळे गोराई पोलिसांनी एडीआरची नोंद करुन त्याचा मृतदेह नंतर भाईंदरच्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या मुलाची ओळख पटावी म्हणून गोराई पोलिसांनी मुंबईसह ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्याचा त्याचा फोटो पाठविला होता. चौकशीदरम्यान मालवणी पोलीस ठाण्यात एका मुलाची मिसिंग तक्रार नोंद झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मुलाच्या पालकांना तो मृतदेह दाखविण्यात आला. यावेळी मुलाची आई किरण बंटी राव हिने तो मृतदेह तिचा मुलगा युवराज याचा असल्याचे सांगितले.

किरण राव ही तिचा पती बंटी आणि दहा वर्षांचा मुलगा युवराज यांच्यासोबत मालाडच्या मढ जेट्टी रोड, पास्कलवाडीतील रुम क्रमांक सातमध्ये राहत होती. बंटी हा किरणच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. २८ जुलैला या दोघांमध्ये याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर बंटी हा युवराजला घेऊन घरातून निघून गेला होता. काही वेळानंतर बंटी घरी आला, मात्र त्याच्यासोबत युवराज नव्हता. तो हरविल्याचे सांगून त्यांनी मालवणी पोलिसांत त्याच्या मिसिंगची तक्रार केली होती. युवराजच्या मिसिंगमागे बंटीचा सहभाग असल्याचा संशय तिने व्यक्त केला होता. त्यामुळे बंटी रावला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरुन झालेल्या भांडणानंतर युवराजला घेऊन निघून गेल्याचे सांगितले. गोराई समुद्रकिनार्‍यावर गेल्याने त्याने पत्नीच्या चारित्र्यावरुन युवराजला पाण्यात बुडवून जिवे मारले. त्याचा मृतदेह पाण्यात टाकून तो पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर बंटीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नीच्या रागातून आरोपी पित्याने स्वतच्या मुलाला पाण्यात बुडवून त्याची हत्या केल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page