दशहतीचे वातावरण निर्माण करणारे बारा आरोपी एक वर्षांसाठी तडीपार

कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुन स्थानिक पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या बारा आरोपीवर एक वर्षांसाठी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था विचार करुन कस्तुरबा मार्ग, समतानगर, दहिसर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.

येत्या काही दिवसांत श्रावण महिना सुरु होत असून या महिन्यांत दहीहंडी, गणेशोत्सवसारखे सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे होणार आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी सण असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून उत्तर प्रादेशिक विभागाने परिसरात दशहत निर्माण करणार्‍या काही सराईत आरोपींची यादी काढण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीत सराईत आणि परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगाराची यादी काढण्यास सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून कस्तुरबा मार्ग, समतानगर आणि दहिसर पोलिसांनी बारा आरोपींची एक यादी सादर केली होती. या आरोपींविरुद्ध रॉबरीसह घरफोडी, खंडणीसाठी धमकी देणे, शिवीगाळ करुन मारामारी करणे, घातक शस्त्रांचा धाक दाखविणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहचवणे आदी वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे.

त्यांच्या कारवायांमुळे स्थानिक रहिवाशांसह महिला, वयोवृद्ध नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या दहशतीमुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करत नव्हते. त्यामुळे अशा गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ज्या बारा आरोपींवर एक वर्षांसाठी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे, त्यात आदेश अरुण लगाडे, जतीन दिलीप धोंडी, शौकतअली नियामतअली शेख (कस्तुरबा मार्ग), आसिफ पाशा पठाण, सतीशकुमार त्रिलोकीनाथ सोनी ऊर्फ जगत, परवेज हुसैन पटेल, सागर सुनिल निगुडकर आणि जय उपेश पटील (समतानगर), कपिल सुरेश माने, सुजीत रामपाल मिश्रा, रामेश्‍वर बाळेश्‍वर ठेंगे, जगदीश कलीराम जोशी ऊर्फ सुरेश ऊर्फ सुर्‍या (दहिसर) यांचा समावेश आहे.

त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ व ५६ (१), (अ), (ब) कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे. तडीपार केलेल्या आरोपीने आदेशाचे उल्लघंन केल्यास , मुंबई किंवा मुंबई उपनगरात प्रवेश करताना किंवा वास्तव्यास असल्याचे आढळून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी असे आदेश जारी करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी परिसरातील तडीपार गुन्हेगार परिसरात दिसून आल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसासह मुंबई पोलिसांच्या आपत्कालिन क्रमांक १०० व ११२ वर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित मुंबई, निर्भय मुंबई हे ध्येय साध्य करण्यासाठी मुंबई पोलीस अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाया भविष्यातही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबवत राहिल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page