ग्रुप बनवून सायबर ठगांना बँक खाती पुरविणारे रॅकेटचा पर्दाफाश

ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपीसह सातजणांची चौकशी सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – ग्रुप बनवून बँकेत बोगस कंपनीच्या नावाने बँक खाती उघडून संबंधित बँक खात्याची माहिती सायबर ठगांना फसवणुकीसाठी पुरविणार्‍या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह सातजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सलमान हबीब पठाण, साजिद निसार अहमद कोठावाला, चिराग केतन टोपराणी, राकेश रमाशंकर मिश्रा, रक्षीत के. राजेंद्र हेगडे, सय्यद वजाहत वाहिउद्दीन, आर्यन रितेश ठक्कर अशी या सातजणांची नावे आहेत. त्यांच्या मोबाईल पोलिसांनी विविध कंपनीचे महागडे मोबाईल, सिमकार्ड, बोगस कंपनीचे दस्तावेज स्टॅम्प तसेच बँक खात्याशी संबंधित दस्तावेज आदी मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने उघडलेल्या बँक खात्यात देशभरात वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

सलमान पठाण नावाच्या एका व्यक्तीने एक ग्रुप बनविला असून या ग्रुपचे सदस्य वेगवेगळ्या बँकेत खाते उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना देतात. याच खात्यात देशभरातील वेगवेगळ्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा होते आणि नंतर ती रक्कम संबंधित सायबर ठगांना पाठविली जाते. त्यासाठी सलमान व त्याच्या सहकार्‍यांना ठराविक रक्कम मिळत असल्याची माहिती मध्य सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळाली होती. या माहितीनंतर सायबर सेल पोलिसांनी सलमानसह त्याच्या सहकार्‍यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती काढताना संबंधित गुन्ह्यांतील काही आरोपी बोरिवलीतील नॅशनल पार्क, मुख्य गेटसमोर बँकेतून पैसे काढण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले होते.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डोरले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, वचकल, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता कावरे, पोलीस हवालदार अभिजीत गोंजारी, किरण पाटील, नवनाथ वेताळे, विकास तटकरे, श्रीकांत पोळ, पोलीस शिपाई कैलास बाबरे, महिला पोलीस हवालदार तनिशा मयेकर, शितल सावंत आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. दुपारी तीन वाजता सलमान व त्याचे सहकारी बोरिवलीतील संबंधित बँकेत आले होते. यावेळी तिथे आलेल्या सलमानसह साजिद कोठावाला आणि चिराग टोपराणी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लाखांच्या पाचशे रुपयांच्या शंभर नोटांचे वीस बंडल, तीन मोबाईल जप्त केले.

सलमान हा वसई, साजिद हा गुजरातच्या अहमदाबाद तर चिराग हा मिरारोड येथे राहतो. सलमानचे मिरारोडला एक खाजगी कार्यालय होते, याच कार्यालयातून सलमान हा इतर सहकार्‍यांच्या मदतीने वेगवेगळ्या बँकेत खाती उघडत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने भाईंदरच्या मॅक्सेस मॉल, टिंबा हॉस्पिटलजवळील केजीएन इंटरप्रायजेस तर मिरारोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या रिचा इंटरप्रायजेस या दोन कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून तेथून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यात सय्यद वाहिउद्दीन, राकेश मिश्रा, रक्षीत हेगडे आणि आर्यन ठक्कर यांचा समावेश होता. या चारही आरोपीचे मोबाईलसह कार्यालयातून इतर मोबाईल, सिमकार्ड, विविध कंपनीचे रबरी शिक्के, बँकेशी संबंधित दस्तावेज पोलिसांनी जप्त केले.

आरोपींच्या चौकशीतून या टोळीचा सलमान हा म्होरक्या असून तो सायबर गुन्ह्यांतील काही ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी त्याने वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना पुरविली होती. या टोळीने दादर, माहीम, बोरिवली आणि मिरारोडच्याच्या एकाच बँकेच्या विविध शाखेत २७ हून अधिक वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने अनेक खाती उघडले होते. त्यासाठी बँकेत बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड, विविध कंपन्याचे दस्तावेज सादर करण्यात आले होते. याच बँक खात्यात फसवणुकीचे कोट्यवधी रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. ही रक्कम नंतर सायबर ठगांना दिली जात होती.

संबंधित सर्व बँक खात्याचे व्यवहार फ्रिज करण्यात आले होते. एनसीसीआरपी पोर्टलवरुन संंबंधित बॅक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले होते. सलमानसह इतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page