चेंबूर येथै एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दुकलीस अटक

दोन कोटीचे ६८१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – चेंबूर येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीस आझाद मैदान युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ६८१ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. मार्केटमध्ये एमडीची प्रचंड मागणी असल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीजण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी तिथे साध्या गस्त सुरु केली होती.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजता चेंबूरच म्हाडा कॉलनी रोडजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ३३३ आणि ३४८ ग्रॅम वजनाचे एकूण ६८१ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत दोन कोटी चार लाख तीस हजार रुपये इतकी आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

अटकेनंतर बुधवारी दुपारी दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते एमडी ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी यापूर्वी ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page