सलोनच्या कर्मचार्याच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मानसिक शोषण करुन सहकारी कर्मचार्याला आत्महत्येस प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – अंधेरीतील लोखंडवाला, ऍनरिच सलोनमध्ये काम करणार्या राहुल थोरात या कर्मचार्याच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जास्मीन सोलंकी, राज सलमानी, सिमा धुमासिया आणि रेणुका कांबळे अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर राहुलचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ३१ डिसेंबरला राहुलने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली, या आत्महत्येनंतर सात महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्योती राहुल थोरात ही महिला तिच्या दोन मुलांसोबत उल्हासनगर येथे राहते. पूर्वी ते सर्वजण गोरेगाव येथील भगतसिंगनगर, बालाजी सोसायटीमध्ये राहत होते. त्यावेळेस तिचे पती राहुल थोरात हे अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका सलोनमध्ये काम करत होते. ७ डिसेंबरला ज्योती ही तिच्या गळ्याच्या ऑपरेशनसह नंणदच्या लग्नासाठी तिच्या नांदगाव येथे गेली होती. यावेळी तिच्या घरी राहुल हा एकटाच राहत होता. ३१ डिसेंबर २०२५ रोजी राहुलने ज्योतीला फोन करुन त्याचे आरोपीसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याचे सांगितले. तसेच तो त्याच्या मानसिक शोषणाला कंटाळून गेला असून त्याच्या जिवाचे बरे-वाईट करणार आहे असे सांगून कॉल कट केला.
त्याच दिवशी दुपारी राहुलने त्याच्या व्हॉटअप स्टेटसवर एक मॅसेज ठेवला होता. त्यात त्याने संबंधित आरोपींवर मानसिक शोषण करत असल्याचा आरोप करुन मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला संबंधित चारही आरोपी दोषी असल्याचे नमूद केले होते. या मॅसेजवर राहुलले स्वतचा फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धाजंली असा मजकूर ठेवला होता. राहुलचा स्टेटस पाहिल्यानंतर ज्योतीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने त्याला सतत कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने शेजार्यांना घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. मात्र दार ठोठावूनही राहुलने दरवाजा उघडला नाही.
सायंकाळी तिला तिच्या शेजारी राहणार्या एका महिलेने कॉल करुन राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे ज्योती ही नांदगावाहून मुंबईत आली होती. जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिला राहुलला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले. राहुल हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसायट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने त्याच्यासोबत सलोनमध्ये काम करणार्या जास्मीन सोलंकी, राज सलमानी, सिमा धुमासिया आणि रेणुका कांबळे यांनी त्यांचा मानसिक शोषण सुरु होता. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी आत्महत्या करत आहे. त्याच्या आत्महत्येला तेच चौघेही जबाबदार असल्याचे नमूद केले होते.
या घटनेनंतर ज्योतीने संबंधित चारही आरोपीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सात महिन्यानंतर पोलिसांनी जास्मीन सोलंकी, राज सलमानी, सिमा धुमासिया आणि रेणुका कांबळे यांच्याविरुद्ध राहुल थोरातचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यज्ञांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.