मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – भावाला अंट्या म्हणून हिणवले म्हणून फरहान इर्शाद खान या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच साजिदअली शाकीरअली सिद्धीकी ऊर्फ अद्दू या २४ वर्षांच्या आरोपीस चुन्नाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे.
शहजाद इर्शाद खान हा कुर्ला येथील कुरेशीनगर, बुढ्ढन रोड चाळीत राहत असून मृत फरहान हा त्याचा लहान भाऊ आहे. आरोपी साजिदअली हादेखील याच परिसरात राहत असून शहजाद आणि साजिदअली हे दोघेही मजुरीचे काम करतात. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी साजिदअलीने त्यांच्या घराच्या भिंतीवर लघवी केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात साजिदअलीने शहजादला अंट्या म्हणून हिणवले होते. त्याचा फरहानने साजिदअलीला जाब विचारला होता. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता कुर्ला येथील कुरेशीनगर हिल, सय्यद बाबा चाळीजवळील मुन्नी आप्पाच्या घराशेजारी फरहान आणि साजिदअली यांच्यात पुन्हा भांडण झाले होते.
यावेळी रागाच्या भरात त्याने फरहानला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. त्याला सिमेंटच्या पायरीवर तोंडावर पाडून जखमी केले होते. या हल्ल्यात फरहानला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे सोमय्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती प्राप्त होताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शहजाद खान याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साजिदअलीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नास्ता बनविण्यावरुन आचार्याला चाकूने भोसकले
दुसर्या घटनेत नास्ता बनविण्याच्या वादातून अमरकुमार भोगी पासवान या ३५ वर्षांच्या आचार्याच्या पोटात त्याच्याच सहकार्याने चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी सकाळी विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अमरकुमार यांच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच हल्ल्यानंतर पळून गेलेल्या राजू रामजियावन गुप्ता या ४५ वर्षांच्या सहकारी आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारास विलेपार्ले येथील गुलमोहर रोड, एन. एस रोड क्रमांक एकवर घडली. याच परिसरातील आझादनगर सोसायटी, सुखसागर इमारत क्रमांक तीनमध्ये अमरकुमार आणि राजू हे दोघेही राहत असून आचारी म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी नास्ता बनविण्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर राजूने अमरकुमार शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळण्यापूर्वीच त्याने किचनमधील चाकूने अमरकुमारच्या पोटात भोसकले होते.
त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या अमरकुमारला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अमरकुमारच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी राजू गुप्ता याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राजूला रात्री उशिरा जुहू परिसरातून पोलिसांनी अटक केली.