एमटीएनएलच्या केबल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

तेरा आरोपींना २१ लाखांच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – एमटीएनएलच्या केबल वायर चोरी करणार्‍या एका टोळीचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत वेगवेगळ्या परिसरातून तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली. स्वप्निल अनिल शेलार, सुरेश शिवाजी शिंदे, प्रथमेश दत्तात्रे मालवणकर, सागर नौशिल कांबळे, साहिल शकील साह, अब्दुल सिद्धीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलिक, मोहम्मद अफजल हसन खान, सुरज ऊर्फ साहिल दिलावर कालेकर, मनोजकुमार शहादिन गुप्ता, मुबारकअली नबीजअली शहा, आझम अब्दुल गफार खान आणि अब्दुल वहाब सादिकमियॉं अन्सारी अशी या तेराजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक जेसीबी, दोन मोबाई असा सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विरेंद्र लालताप्रसाद यादव हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असून सध्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. २२ जूनला कांदिवलीतील अशोकनगर क्रॉस रोड चार परिसरातील एमटीएनएलची भूमिगत असलेली नऊ लाखांची १५३ मीटर लांबीच्या दोन हजार पेअरच्या चार केबल वायरची अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. हा प्रकार नंतर एमटीएनएल अधिकार्‍यांच्या लक्षात येताच विरेंद्र यादव यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमटीएनएलच्या केबल वायर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या इतर काही गुन्हे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक फौजदार राजेश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, अतुल ननावरे, पोलीस शिपाई दौलत साळुंके, निलेश भिकले आदी पथकाने तपास सुरु केला होता.

आरोपीचा शोध सुरु असताना पोलिसांनी स्वप्निल शेलार आणि सुरेश शिंदे यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नाव समोर आली होती. त्यानंतर इतर अकरा आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेल्या जेसीबीसह मोबाईल असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दूध भेसळप्रकरणी एका आरोपीस अटक
अन्य एका कारवाईत समतानगर पोलिसांनी नामांकित कंपनीच्या दूधात भेसळ करणार्‍या एका आरोपीस अटक केली. ईरन्ना लिंगप्पा गोपनाबोनई असे या ४८ वर्षीय आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी ७४ लिटर भेसळयुक्त दूधासह दूधात भेसळीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ईरन्ना हा कांदिवलीतील दामूनगर, रामउजागर चाळीत राहत असून तो त्याच्या राहत्या घरी दूधात भेसळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंपदे पोलीस निरीक्षक धनंजय कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, रघुनाथ भोये, सहाय्यक फौजदार राजेश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, अतुल ननवरे, पोलीस शिपाई दौलत साळुंके, निलेश भिकले, अशोक गाढवे आदी पथकाने तिथै छापा टाकला होता. यावेळी ईरन्ना हा नामांकित कंपनीच्या दूधात भेसळ करताना दिसून आला. घटनास्थळाहून पोलिसांनी ७४ हजार भेसळयुक्त दूधासह अमुल, गोकुळ कंपनीच्या बोगस पिशव्या, भेसळीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page