जेवणाच्या बिलाच्या वादात मध्यस्थी करणे जिवावर बेतली
३० वर्षांच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोन्ही मारेकर्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – जेवणाच्या बिलाच्या वादात मध्यस्थी करणे एका ३० वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली. अजीज मेहमूद आतिक खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी कुठलाही पुरावा नसताना पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्यांना गोरेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. अजय मुन्नी उपाध्याय आणि विकास देवराज पासवान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गोरेगाव येथे राहतात. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी ११ ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता गोरेगाव येथील प्रेमनगर, सलमान हॉटेलसमोर घडली. या ठिकाणी असलेल्या सलमान हॉटेलमध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली असून त्यात संबंधित व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पोलिसांना संबंधित व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. चौकशीदरम्यान त्याचे नाव अजीत खान असल्याचे उघडकीस आले. त्याचा भाऊ हबीब मोहम्मद आतिक खान हा तिथे उपस्थित होता. त्याच्या चौकशीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.
मंगळवारी ११ ऑगस्टला सलमान हॉटेलमध्ये दोन्ही आरोपी आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल भरण्यास नकार दिला होता. यावेळी हॉटैलचा मालक दानिश खान यांनी त्यांच्याकडे बिलाच्या पैशांची मागणी केली होती. याच कारणावरुन त्यांनी दानिश यांच्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे असलेल्या अजीज आणि राजेश ऊर्फ टकला यांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी त्यांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करु नये असे सांगून अजीजवर हाताने आणि फळे ठेवण्याच्या लाकडी बॉक्सने डोक्यात मारहाण केली होती. त्यात अजीज हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकणी हबीब खान याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येनंतर दोन्ही आरोपी पळून गेले होते. त्याची ओळख पटली नव्हती. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश उमरे, पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, सोहन पेचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक् सतीश चौगुले, राठोड, दिपक खराडे, योगेश रंधे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कांगणे, आकाश काळे, सत्पाल बोधे, विशाल दौंडकर, अक्षय मांदळे, रोहन कोलारे, सूर्यभान घोलप, गजानन बागुल, सचिन दळवी, कल्पेश नेहरे, भरत कदम, पोलीस शिपाई सौरभ चव्हाण, प्रज्वल मोहिते, भुपेंद्र सालकर, विशाल दानी, सतीश पाटील, सचिन मेश्राम, सुहास शिंदे यांनी तपास सुरु केला होता.
सहा विशेष पथकाने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या पथकाने कुठलाही पुरावा नसताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अवघ्या सहा तासांत दोन संशयितानंा चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचे नावे अजय उपाध्याय आणि विकास पासवान असल्याचे उघडकीस आले. त्यांनीच अजीजची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.