पत्नीच्या हत्येनंतर पळून गेलेल्या पतीला महाड येथून अटक

चारित्र्याच्या संशयावरुन केली होती पत्नीची हत्या

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पत्नीच्या ह्त्येनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर महाड येथून कुरार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. आकाश चंद्रकांत साळुंखे ऊर्फ वरवंटा असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. प्रेमविवाह झालेल्या आकाशने त्याची पत्नी सुचिता हिची चारित्र्याच्या संशयावरुन तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती, या हत्येनंतर तो पळून गेला होता असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना रविवारी ९ ऑगस्टला मध्यरात्री पावणेदोन ते सव्वादोनच्या सुमारास मालाड येथील कुरार व्हिलेज, तानाजीनगर, शिवसागर सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये सुचिता ही तिचा पती आकाश आणि चार वर्षांच्या मुलासोबत राहत होती. पाच वर्षांपूर्वी या सुचिता अणि आकाश यांचा प्रेमविवाह झाला होता. सुचिता ही एका पॅथोलॉजी लॅबोरेटरीमध्ये कामाला होती तर आकाश हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला दारु आणि ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो सुचिताकडे सतत पैशांची मागणी करत होता. तिने पैसे दिले नाहीतर तिचा मानसिक शोषण करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते.

रविवारी ९ ऑगस्टला रात्री उशिरा सुचिता आणि आकाश यांच्यात याच कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने घरातून चाकूने तिच्या छातीवर भोसकले होते. त्यात ती गंभीरररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने रक्तबंबाळ झालेल्या सुचिताला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे सुचिताला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच आकाश हा मुलाला हॉस्पिटलमधून टाकून पळून गेला होता. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुचिताचा भाऊ सुरज अनिल कांडार याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाशविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना तो महाड येथील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक भारत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सचिन पांचाळ, अखिलेश चौबे, पोलीस हवालदार मोरे, कदम, गुजर, खांडवी, राठोड, सोनावणे, फडतरे, सातपुते, गोरे, तुप आदी पथक महाड येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने तिथे लपून बसलेल्या आकाशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याची पत्नी सुचिताची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page