ए वॉर्डच्या दुय्यम अभियंताला वीस हजाराची लाच घेताना अटक
क्लाऊड किचनसाठी परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – ए वार्डच्या महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता राधेश्याम विजयप्रसाद जयस्वाल यांना बुधवारी सायंकाळी त्यांच्याच कार्यालयात वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. राधेश्याम यांच्यावर एका महिला व्यावसायिकाकडून क्लाऊड किचनसाठी लागणार्या परवानगी देण्यासाठी सव्वालाखांची लाचेची मागणी केल्याचा तसेच बक्षिण स्वरुपात वीस हजाराची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने तिथे उपस्थित पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार महिलेने तिच्या राहत्या घरी घरगुती जेवणाच्या (क्लाऊड किचन) व्यवसायासाठी किचनची गटार लाईन आणि चेंबर्स दुरुस्तीसाठी लागणार्या परवानगी मिळावी म्हणून महानगरपालिकेच्या ए वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापन विभागत अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कारवाईसाठी राधेश्याम जयस्वाल यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला होता. या अर्जावर काहीच कारवाई होत नसल्याने तक्रारदार महिला त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेली होती. यावेळी तिने तिच्या अर्जाबाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती. तिला परवानगी देण्यासाठी राधेश्याम जयस्वाल यांनी तिच्याकडे सव्वालाखांची लाचेची मागणी केली होती.
लाच दिल्याशिवाय तिला परवानगी मिळणार नाही असे त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते, त्यामुळे तिने लाच देण्याची तयारी दर्शवून राधेश्याम जयस्वाल यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची सोमवारी १७ ऑगस्टला शहानिशा करण्यात ाअली होती. यावेळी राधेश्याम जस्वाल यांनी तिच्याकडे लाचेची मागणी करुन वीस हजार रुपये बक्षिस स्वरुपात घेण्याचे मान्य केले होते.
या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिपीका डंगारणे, दयानंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहीनी पगारे, सहाय्यक फौजदार संातेष सणस, पोलीस हवालदार संदीप शिंदे, ओम झांजुर्णे, जगदीश सोनावणे, सुनिल रावराणे, पूनम नलावडे, देसाई, साबळे ए वॉर्ड विभागात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदार महिलेकडून वीस हजाराची बक्षिस स्वरुपात लाच घेताना या पथकाने रंगेहाथ अटक केली.
यावेळी त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडील मोबाईलसह सात लाख तीन हजार साठ रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत गुरुवारी दुपारी त्यांना विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.