सायबर ठगांना सिमकार्ड पुरविणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

फसवणुकीसाठी सीईओ-बॉसच्या नावाने बोगस मॅसेज पाठवत होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कंपनीच्या सीईओ-बॉसच्या नावाने सायबर ठगांना सिमकार्ड पुरविणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत बिहारहून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आमीर चॉंद मोहम्मद खान आणि सुरजकुमार प्रदीपकुमार साव अशी या दोघांची नावे असून ते दोघेही बिहार आणि झारखंडचे रहिवाशी आहे. या आरोपींकडून पोलिसांनी १६१ विविध कंपनीचे सिमकार्ड, मेगाफोन, सिमकार्ड चालू करण्यासाठी लागणारे एअरटेल मित्र ऍप असलेला पोको कंपनीचा मोाबईल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने फसवणुकीसाठी सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात अनेक व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन सिमकार्ड दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

निशित अरविंद जोबालिया हे मालाड येथे राहत असून नरिमन पॉईट येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंट विभागात महाव्यवस्थाक म्हणून काम करतात. सत्यपाल जैन हे कंपनीचे संचालक असून संपतकुमार बुधेका हे मुख्य फायानान्स अधिकारी म्हणून काम करतात. कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती त्यांच्याकडून त्यांना दिली जात होती. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना सत्पाल जैन यांच्या नावाने एका बोगस व्यक्तीने मॅसेज करुन त्यांना त्यांचा नवीन मोबाईल क्रमांक कोणालाही शेअर करु नये यासाठी विनंती केली. त्यानंतर त्याने त्यांना कंपनीच्या बँक खात्यातून एका बँक खात्यात तातडीने ४८ लाख ६० हजार ५११ रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते.

तो मॅसेज कंपनीचे संचालक सत्यपाल जैन यांचा असल्याचा समजून त्यांनीही कुठलीही शहानिशा न करता त्याने दिलेल्या बँक खात्यात संबंधित रक्कम ट्रान्स्फर केली होती. नंतर त्यांना तो मॅसेज बोगस असल्याचे तसेच सत्यपाल जैन यांनी अशा प्रकारे कुठलाही मॅसेज किंवा बँक खात्याचा तपशील दिला नसल्याचे समजले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

तपासात कंपनीचा संचालक असल्याचे भासवून संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड बिहारच्या महाराजगंज येथून इश्यू झाले होते. या परिसरातील रहिवाशी आणि इतर रहिवाशांच्या कागदपत्रांच्या आणि ई-केवायसीचा गैरवापर करुन ते सिमकार्ड ऍक्टिव्ह करण्यात आले होते. हा सर्व प्रकार बिहारच्या एअरटेल कंपनीचा सिमविक्रेता आमीर चााद खान याने केला होता. त्याने ग्राहकांचा विश्‍वासघात करुन जुना क्रमांक पोर्ट आऊट करुन देतो असे सांगून सिमकार्ड ऍक्टिव्ह केले होते. त्यातील आठ सिमकार्ड त्याने सुरज साव याच्या मदतीने सहा हजारांना विक्री केली होती. या व्यवहारात सुरजने आमीरच्या एअरटेल बँक खात्यात युपीआयद्वारे पैसे पाठविले होते.

तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सायरस इराणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गोपाळ पोलीस हवालदार प्रताप जाधव, मंगेश गायकवाड व अन्य पोलीस पथकाला बिहारला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आमीर चॉंद खान आणि सुरजकुमार साव या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. प्राथमिक तपासात या दोघांचा दक्षिण सायबर सेलसह पंजाबच्या गुरुग्राम, हरियाणा, नवी दिल्ली, कोलकाता, तामिळनाडू येथील प्रत्येकी एका गुन्ह्यांत सहभाग असल्याचे एनसीआरपी तक्रारीवरुन उघडकीस आले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page