कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली म्हणून सूनेची गळा आवळून हत्या
वयोवृद्ध सासूसह घरातील मोलकरीण, तिचा पती व मुलाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कौटुंबिक हिसांचाराची पोलिसांत तक्रार केली म्हणून सपना प्रमोद गंजी या ३५ वर्षांच्या सूनेची तिच्याच वयोवृद्ध सासूने घरातील मोलकरीणीसह तिच्या पती आणि दोन मुलांच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पाचही आरोपींना पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये सपनाची ६३ वर्षांची वयोवृद्ध सासू धनलक्ष्मी शिक्षापती गंजी, मोलकरीण मंगलाबाई सुरेश जाधव, तिची मुलगी शिवानी सुरेश जाधव, पती सुरेश गणपत जाधव आणि मुलगा साजन सुरेश जाधव यांचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना घाटकोपर येथील लोकल कोर्टाने पोलीस सुनावली आहे.
ही घटना रविवारी १६ ऑगस्टला सायंकाळी सात वाजता घाटकोपर येथील लक्ष्मीनगर, त्रिवेणी अपार्टमेंटच्या डी विंगच्या रुम क्रमांक २०४ मध्ये घडली. ६३ वर्षांचे राजेंद्र नरसय्या वल्लाल हे टेलरकाम करत असून नालासोपारा येथे राहतात. त्यांना नरेंद्र नावाचा एक मुलगा असून तो सध्या कॅनडामधील एका हॉटेलमध्ये तर सून राजश्री ही दुबई येथे कामाला आहे. सपना ही मुलगी विवाहीत असून ती घाटकोपर येथे राहते. २०१३ साली तिचे प्रमोद गंजीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दोन वर्ष सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र नंतर तिचा पती प्रमोद, सासरा भिक्षापती, सासू धनलक्ष्मी आणि दिर किरण आणि गणेश गंजी हे तिला मानसिक शोषण करत होते.
क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती, सतत टोमणे मारले जात होते. त्यांच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी सपनाने तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात कौटु्रंबिक हिंसाचारासह विनयभंग, अनैसगिंक लैगिंक अत्याचार, शिवीगाळ करुन मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरु होती. ऑगस्ट २०२४ रोजी प्रमोदसह इतर आरोपींनी घडलेल्या प्रकाराची माफी मागून सपनासोबत नव्याने संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. भविष्यात तिला कुठलाही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे सपना ही तिच्या पतीसोबत विक्रोळी येथे स्वतंत्र घर घेऊन राहू लागली होती.
एक वर्षांनी ते दोघेही पुन्हा त्यांच्या घाटकोपर येथील घरी आले होते. सोमवारी रात्री साडेबारा वाजता भिक्षापती गंजी यांनी सपना ही बाथरुममध्ये पडली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे राजेंद्र वल्लाल यांना फोनवरुन माहिती दिली होती. त्यामुळे ते सर्वजण राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना सपनाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. मृतदेहाची पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात मोठी जखम होती. तिच्या चेहर्यावर, मानेवर, खांद्यावर मारहाणीचे व्रण होते. सपनाचा मृत्यू नैसगिक नसून तिची तिच्याच सासूने हत्या केल्याचा राजेंद्र वल्लाल यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी पंतनगर पोलिसांत सासू धनलक्ष्मीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुंन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने सोमवार २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तिची पोलिसांकडून चौकशी केली असता तिने सपनाला दारु पिण्याचे व्यसन होते. तिचे विवाहबाह्य संबंध होते. तसेच तिने तिच्या कुटुंबियांच्या विरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याचा तिच्या मनात राग होता. जून २०२६ रोजी सपना ही दुबईला सुट्टीसाठी गेली होती. त्यानंतर एक महिन्यापूर्वीच तिने तिची पूर्वीची मोलकरीण मंगला जाधव, तिचा मुलगा साजन जाधव, मुलगी शिवानी जाधव यांच्या मदतीने सपनाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिची गळा आवळून हत्येची योजना बनविली होती. त्यासाठी तिने त्यांना तीन लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
ठरल्याप्रमाणे धनलक्ष्मीच्या जाधव कुटुंबियांना १६ ऑगस्टलना तिच्या घरी प्रवेश केला होता. यावेळी सपना ही दारुच्या नशेत होती. सायंकळी पावणेपाच वाजता त्यांनी सपनाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारुन, तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिची गळा आवळला. मात्र तरीही तिचा जीव जात नसल्याने सुरेश जाधव आणि साजन जाधव हे दोघेही तिच्या गळ्यावर पाय ठेवून उभे राहिले आणि तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन तेथून पलायन केले होते.
सपना ही बाथरुममध्ये पडून जखमी झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र हा बनाव पोलिसांनी हाणून पाडला. तपासात आलेल्या जाधव कुटुंबातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने शुक्रवार २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास दातीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, अजीत गोंधळी, राजेश चंदुगडे, अस्लम खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश शिंदे, दगडू जाधव, प्रशांत कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गोडबोले, काटकर, गुमलाडू, महिला पोलीस उपनिरीक्षक चट, सहाय्यक फोजदार रमेश पवार, पोलीस हवालदार भाऊसाहेब घुगे, अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार दत्तू पवार, नारायण दळवी, रवी चव्हाण यांनी केली.