मालक-संचालकाचे नाव व फोटोचा गैरवापर करुन ९१ लाखांना गंडा
सायबर ठगांच्या संपर्कात राहून बँक खाते पुरविणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – विलेपार्ले येथील बावा इंटरनॅशनल हॉटेलचे मालक आणि संचालक विक्रमवीरसिंग गुरिंदरसिंग बावा यांच्या नावासह फोटोचा गैरवापर करुन सुमारे ९१ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी एका आरोपीस पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. विकासकुमार लालबहादूर चौबे असे या आरोपीचे नाव असून तो या गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात राहून त्यांच्यासाठी बँक खाती पुरवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील काही रक्कम एका बँक खात्यात फ्रिज करण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात आले.
प्रविण बळीराम भोसले हे नवी मुंबईतील खारघरचे रहिवाशी असून ते विजयदिप हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. विलेपार्ले येथील नेहरु रोड, हॉटेल बाबा इंटरनॅशनलमध्ये त्यांचे एक कार्यालय आहे. त्यांचे मालक करणवीरसिंग गुरींदरसिंग बावा आणि विक्रमवीरसिंग गुरिंदरसिंग बावा आहेत. हॉटेलचे एका खाजगी बँकेत करंट अकाऊंट असून त्यात विक्रमवीरसिंग यांचा मोबाईल आणि ईमेलची नोंद आहे. बँकेतील सर्व व्यवहार हॉटेलचे मालक आणि संचालक करणवीरसिंग आणि विक्रमवीरसिंग यांच्यापैकी कोणाच्याही लेखी, तोंडी, फोन तसेच व्हॉटअपच्या सांगण्यावरुन केले जाते.
१४ जुलैला प्रविण भोसले यांना करणवीसिंग यांच्या नावाने एक व्हॉटअप मॅसेज आला होता. त्यात त्यांचा नवीन क्रमांकाचा उल्लेख करण्यात आला होता. व्हॉटअप प्रोफाईलमध्ये त्यांचा फोटो होता. त्यामुळे करणवीरसिंग यांचा नवीन क्रमांक समजून त्यांनी मोबाईल क्रमंाक सेव्ह केला होता. दुसर्या दिवशी त्यांना त्याच मोबाईलवरुन पुन्हा मॅसेज आला होता. त्यात त्यांना कंपनीमध्ये आहे अथवा कसे याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावेळी करणवीरसिंग यांच्या मोबाईलवरुन त्यांना एका करंट खात्यात ९८ लाख रुपये तातडीने ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. मॅसेजमध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक देण्यात आले होते.
हा मॅसेज कंपनीचे मालक-संचालक करणवीरसिंग यांनी पाठविल्याचे समजून त्यांनी संबंधित बँक खात्यात ९८ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. याबाबत बॅकेने पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज पाठविला होता. याच दरम्यान प्रविण भोसले यांचे हॉटेलची कॅशिअर-अकाऊंट हेड शीतल गजेंद्र शिरसाटशी बोलणे झाले होते. यावेळी तिने विक्रमवीरसिंगशी बोलणे झाले असून त्यांनी अशी कोणतीही रक्कम कुठल्या बँक खात्यात पाठविण्यास सांगितली नसल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी त्यांना कॉल करुन ही माहिती दिली. यावेळी करणवीरसिंग यांनी त्यांचा कोणताही नवीन मोबाईल क्रमांक नसून त्यांनी त्यांना कुठलाही मॅसेज पाठविला नाही किंवा कुठल्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले नव्हते. या प्रकाराने प्रविण भोसले यांना धक्काच बसला होता.
त्यांच्या मालक-संचालकाचे नाव आणि फोटोचा वापर करुन अज्ञात सायबर ठगाने त्यांच्याशी संपर्क साधून ही फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांकासह पश्चिम सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली. या विनंतीनंतर बँकेच्या नोडल अधिकार्यांनी संबंधित बँक खात्यातील काही रक्कम फ्रिज केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. संबंधित बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना विकासकुमार चौबे याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. तपासात त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या तो संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने संबंधित बँक खाते उघडले होते, त्याच्या याच बँक खात्यात तक्रारदारासह इतर गुन्ह्यांतील काही फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर विकासकुमार चौबे याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.