लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारणारा मॅनेजर गजाआड
अनिवासी भारतीय वयोवृद्धाचे ८१ लाख ८० हजाराचे सर्व दागिने हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – कांदिवलीतील एका नामांकित बॅकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या बँकेच्या मॅनेजरला कांदिवली पोलिसांनी अटक केली. कुलदीप रामचंद्र सहानी असे या आरोपी मॅनेजरचे नाव असून त्याच्याकडून तक्रारदार अनिवासी भारतीय असलेल्या वयोवृद्धाचे ८१ लाख ८० हजाराचे ६१० ग्रॅम वजनाचे सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन सर्व दागिने हस्तगत केल्याने तपास अधिकार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
प्रदीप मोतीराम भाटिया हे ७४ वर्षांचे वयोवृद्ध अनिवासी भारतीय असून कांदिवलीतील आंबावाडी, ज्योती पार्कमध्ये त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. गेल्या ५२ वर्षांपासून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दुबईतील ओघ मिथा रोड, रिम चारच्या फ्लॅट क्रमांक ५१२ मध्ये राहतात. मार्च २०२४ रोजी त्यांनी कांदिवलीतील एम. जी रोडवरील इंडसइंड बँकेच्या लॉकरमध्ये त्यांच्या मालकीचे ६१० ग्रॅम वजनाचे ८१ लाख ८० हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यानंतर ते दुबईला निघून गेले होते. दोन वर्षांनी प्रदीप भाटिया हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना त्यांच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने लॉकर उघडून आतील ८१ लाख ८० हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केले होते.
हा प्रकार लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बँक लॉकरमधील दागिन्यांच्या अपहाराची पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र चव्हाण, प्रमोद वाघ, विक्रम डुंबरे, पोलीस शिपाई बाळकृष्ण खाडे, संकेत सावंत, महिला पोलीस शिपाई जयश्री तलवारे यांनी तपास सुरु केला होता.
तपासात प्रदीप भाटिया यांनी दोन वर्षांपूर्वी लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. त्यामुळे बँकेच्या सीसीटिव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपासात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. तरीही पोलिसांनी बॅकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत त्यांना बँकेत लॉकर मिळवून देण्यात बँकेचा तत्कालिन उपशाखा प्रबंधक कुलदीप सहानी यांनी मदत केली होती. त्यामुळे त्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती.
कुलदीप हा गोरेगाव येथील श्रीकृष्णानगर, संतोषनगर परिसरात राहत होता. त्याच्या बँक खात्याची माहिती घेताना त्यात दोन वर्षांत नऊ कोटीचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात त्याने सोने तारण ठेवून मोठी रक्कम घेतली होती. या सर्व सोन्याच्या दागिन्यांचे फोटो प्राप्त करण्यात आले. त्यात प्रदीप भाटिया यांच्या बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या काही दागिन्यांचा समावेश होता. तपासात ही बाब उघडकीस येताच कुलदीप सहानीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच बँंक लॉकरमधील सोन्याचे दागिने काढल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अपहार केलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
गुन्हा दाखल होताच अवघ्या चार दिवसांत कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन आरोपी बँक मॅनेजरला अटक केली आणि त्याच्याकडून गुन्ह्यांतील ६१० ग्रॅम वजनाचे ८१ लाख ८० हजाराचे सर्व दागिने परत मिळविले आहे. या गुन्ह्यांचा तपास करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे व त्यांच्या पथकाचे पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी कौतुक केले होते.