पोलीस हवालदाराला ३० हजाराची लाचेची रक्कम घेताना अटक
व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – भंगार व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी ३५ हजाराची लाचेची मागणी करुन ३० हजाराची लाचेची रक्कम घेताना भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र कृष्णा पवार यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईलसह १८ हजार ६५० रुपयांची कॅश जप्त केली आहे. व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणे राजेंद्र पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.
३३ वर्षांचे तक्रारदार परळ परिसरात राहत असून तिथे त्यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात पोलीस हवालदार राजेंद्र पवार आले होते. त्यांनी त्यांना भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवायचा असेल तसेच व्यवसायात कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांना ३५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. ही लाच दिली नाहीतर त्यांना तिथे व्यवसाय करता येणार नाही असा अप्रत्यक्ष धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटला तक्रार केली होती.
बुधवारी १९ ऑगस्टला ही तक्रार प्राप्त होताच त्याची दुसर्या दिवशी पडताळणी करण्यात आली होती. यावेळी राजेंद्र पवार यांनी ३५ हजाराची लाचेची मागणी करुन तीस हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून येताच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बडगुजर, पोलीस निरीक्षक मनोज गोडसे, सहाय्यक फौजदार पोळ, पाडळे, मठपती, गावडे, पोलीस शिपाई वाईगडे, चौरे, पाटील यांनी कारिवली पोलीस चौकीजवळ सापळा लावला होता.
यावेळी तक्रारदाराकडून तीस हजाराची लाचेची रक्कम घेताना पोलीस हवालदार राजेंद्र पवार यांना या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईलसह काही कॅश जप्त केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले. अटकेनंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथेच त्यांची चौकशी सुरु आहे. शुक्रवारी दुपारी राजेंद्र पवार यांना विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.