प्रोडेक्शन व्यावसायिक महिलेच्या घरातील कॅश-हार्डडिस्कची चोरी
एक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सहाय्यक व्यवस्थापकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – प्रोडेक्शन हाऊसच्या महिला व्यावसायिकाच्या घरातून कॅशसहीत चित्रपटाचे शूटींग असलेली हार्डडिस्क चोरी करुन पळून गेलेल्या सहाय्यक व्यवस्थापकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. देवेंद्र प्रकाश ऊर्फ विनय ताराचंद विश्वकर्मा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच देवेंद्र प्रकाश पळून गेला होत, अखेर एक महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानसी सुशील गुप्ते ही महिला गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर परिसरात राहत असून तिचे पती फिटनेस कोच आहे. तिच्या मालकीचे यंत्रा पिक्चर्स नावाचे फिल्म प्रोडेक्शनचे एक कार्यालय विलेपार्ले परिसरात आहे. तिच्या घरासह कार्यालयात देवेंद्र प्रकाश हा एक वर्षांपूर्वी ऑफिस ऍडमिन म्हणून काम करत होता. तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी असून सध्या मालाडच्या जनकल्याणनगर परिसरात राहत होता. कामात हुशार असल्याने तिने त्याला प्रोडेक्शन असिस्टंट-कम-मॅनेजर म्हणून बढती दिली होती. त्यासाठी त्याला दरमहा २५ हजार वेतन दिले जात होते. कार्यालयातील व्यवहारातील पैसे तसेच इतर वस्तू ती तिच्या घरातील कपाटात ठेवत होती. १५ मेला तिने कपाटात दोन लाखांची कॅश आणि लेसी कंपनीची दहा टिबी क्षमतेची हार्ड ड्राईव्ह ठेवली होती.
या कपाटाची चावी तिच्यासह देवेंद्र प्रकाशकडे होती. २८ जूनला त्याने गावी जाण्यासाठी तिच्याकडे एक ते दिड महिन्यांची रजा मागितली होती. मात्र ती रजा दिर्घ कालावधीची असल्याने तिने त्याची रजा नामंजूर केली होती. २८ जूनपर्यंत काम करुन तो २९ जूनला तो कोणालाही काहीही न सांगता त्याच्या गावी निघून गेला होता. त्यासाठी त्याने तिच्याकडून तीस हजार रुपये आगाऊ घेतले, मात्र त्याने ती रक्कम तिला परत केली नाही. गावी गेल्यानंतर त्याने तिला मॅसेज करुन तिने सोपविलेल्या कामाबद्दल तिचे आभार मानले, तसेच तिच्या पगारातून उचल रक्कम घेण्याची विनंती केली होती.
काही दिवसांनी त्याने तिची बदनामी सुरु केली होती, तिच्या भागीदारांना, कर्मचार्यांना तिच्याविषयी उलटसुलट भाषा वापरुन तिचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी देत होता. इतकेच नव्हे तर तिच्या भावालाही त्याने धमकी दिली होती. याच दरम्यान तिला देवेंद्र प्रकाशने तिच्या घरातील काही वस्तूचा अपहार केल्याचे समजले. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून त्याने तिच्या घरातील सीसीटिव्ही फुटेज डिलीट केले होते. सर्व सामानाची तपासणी केल्यानंतर तिला कपाटातील दोन लाखांची कॅश आणि चित्रपटाच्या शूटिंगचा डेटा असलेली हार्डडिस्क चोरी केल्याचे दिसून आले.
हा प्रकार उघडकीस येताच तिने त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर देवेंद्र प्रकाशविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमेाहीम सुरु असताना गेल्या एक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या देवेंद्र प्रकाशला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच मानसी गुप्ते हिच्या घरातून कॅश आणि हार्डडिस्क चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.