कर्ज फेडण्यासाठी स्वतच्या घरी आश्रय दिलेल्या बहिणीच्या घरी चोरी

गुन्हा दाखल होताच आरोपी बहिणीला चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – कर्ज फेडण्यासाठी स्वतच्या घरी आश्रय देणार्‍या बहिणीच्या घरी तिच्या मामेबहिणीने चोरी केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी मामेबहिणीला गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कॅनव्ही बोनवेंचर फर्नाडिस असे या २० वर्षीय आरोपी बहिणीचे नाव असून तिला पुढील चौकशीसाठी वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

फ्लाविया ऍन्थोनी नाझरेद ही महिला सांताक्रुज येथील वाकोला, साईबाबा मंदिराजवळील थॉमस मिरांडा चाळीत राहते. ती मार्श ऍण्ड मेक्लेन पवई स्पेशलिस्ट म्हणून काम करते. कॅनव्ही ही तिची मामेबहिण असून ती गेल्या पाच महिन्यांपासून तिच्याच घरी राहत होती. ती एका आयटी कंपनीत कामाला आहे. १७ ऑगस्टला दुपारी एक वाजता ती तिच्या कामावर निघून गेली होती. काही वेळानंतर तिची कॅन्हवी हीदेखील तिच्या कामासाठी घरातून निघून गेली, यावेळी तिने घराला बाहेरुन कुलूप लावला होता. रात्री साडेबारा फ्लाविया नाझरेद ही घरी आली असता तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. तिच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण, कडा, चार हजाराची कॅश असा ५ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

या घटनेनंतर तिने वाकोला पोलिसांना ही माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कवळे, रोहन बगाडे, महिला पोलीस उपनिरीक्षक भावना साळगावकर, पोलीस उपनिरीक्षक दिपक दराडे, हेमंत मिरजे, पोलीस हवालदार सोनावणे, बारहाते, अमोल पाटील, महिला पोलीस हवालदार निलम मोरे, महिला पोलीस शिपाई शुभांगी जाधव यांनी संमातर तपास सुरु केला होता.

हा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले, तिथे पोलिसांना कोणीही संशयास्पद व्यक्ती दिसून आले नाही. घरातून कॅन्हवी ही उशिराने बाहेर पडली होती. त्यामुळे तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मानवी आणि तांत्रिक कौशल्यचा वापर करुन तिची चौकशी केल्यानंतर तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. तिच्यावर कर्ज होते, ते कर्ज फेडण्यासाठी तिला पैशांची प्रचंड गरज होती. त्यामुळे तिने तिच्या बहिणीच्याच घरी चोरीची योजना बनविली होती.

१७ ऑगस्टला फ्लाविया ही कामावर निघून गेल्यानंतर तिने कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तूसह कॅश चोरी केली होती. तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कॅन्हवीचे आई-वडिल नसून ती तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. तिचे कोणीही नसल्याने फ्लाविया हिने तिला स्वतच्या घरी आश्रय दिला होता, मात्र कर्जाची परतफेड करण्यासाठी तिने तिच्याच घरी चोरी केल्याने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अटकेनंतर तिला पुढील चौकशीसाठी वाकेला पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माळी यांनी सांगितले.

मोबाईल शॉपमधील चोरीप्रकरणी दोघांना अटक
दुसर्‍या घटनेत एकाम आजम शेख ऊर्फ घोडा आणि तौहिद इजहार शेख या दोन आरोपींना चेंबूर पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी मोबाईल शॉपमधून चोरी केलेले ६७ हजाराचे सातही मोबाईल हस्तगत केले आहेत. इम्रान हाजी मोहम्मद खान हे चेंबूर येथे राहत असून त्यांचा चेंबूरच्या शेल कॉलनीत आई के मोबाईल्स नावाचे एक मोबाईल शॉप आहे. बुधवारी रात्री उशिरा या शॉपचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने विविध कंपनीचे ६७ हजाराचे सात मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

सीसीटिव्ही आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण उंडे, पोलीस उपनिरीक्षक अरुण केंद्रे, पोलीस हवालदार अजीत कावळे, विनायक चव्हाण, पोलीस शिपाई गणेश सूर्यवंशी यांनी ईस्टर्न एक्सवेस हायवेलगत, सर्व्हिस रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून एकाम शेख आणि तौहिद शेख या दोघांना ताब्यात घेतले.

ते दोघेही कुर्ला येथील कुरेशीनगरचे रहिवाशी आहे. या गुन्ह्यांचा त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पाटील हे करत आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page