सायबर ठगांना म्युल बँक खाती पुरविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

ऑनलाईन गेमिंग, क्रिकेट बेटींग व कॅसिनोसाठी खाती पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – फसवणुकीसाठी सायबर ठगांना म्युल बँक खाती पुरविणार्‍या एका संघटित नेटवर्कचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. निखील कमलकुमार जसवानी, राहुल श्यामलाल परवानी आणि जय बिहारीलाल तीरथानी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे मध्यप्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून बँकेशी संबंधित दस्तावेज तसेच मोबाईल, सिमकार्ड, कार असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत ज्योती पाटील, जया डोंगरी आणि निशा डोंगरी या मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंडमध्ये राहणार्‍या तीन महिलांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले तर इतर पाचजणांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही टोळी आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना अल्प आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडून त्याची माहिती फसवणुक करणार्‍या सायबर ठगांना देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सायबर ठगांना म्युल बँक खाती उपलब्ध करुन देणारी एक टोळी कार्यरत असून ही टोळी आथिकदृष्ट्या गरजू लोकांना हाताशी धरुन त्यांचे वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करुन विविध बँकेत खाती उघडून या बँक खात्याची माहितीसह डेबीट कार्ड, सिमकार्ड आदी फसवणुकीसाठी सायबर ठगांना देत असल्याचे माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या टोळीशी संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मुुंंबईतील गोवंडी, मानखुर्द, डोंगरी, नवी मुंबईतील बेलापूर, पनवेल आणि उस्मानाबाद येथे पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाला पाठविले होते. त्यांचा शोध सुरु असताना याच गुन्ह्यांतील काहीजण डोंगरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त तनवीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलीस हवालदार जितेंद्र चौगुले, विशाल सोनावणे, पोलीस शिपाई सुरज धायगुडे, श्रीकांत गायकवाड यांनी सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील डॉ. महेश्‍वरी रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून निखील जसवानी, राहुल श्यामलाल परवानगी आणि जय तिरथानी या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत ते तिघेही मध्यप्रदेशचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले.

त्यांच्या चौकशीतून ज्योती पाटील, जया डोंगरे आणि निशा डोंगरे या तीन महिलांचे नाव समोर आले होते. त्यामुळे या तिघींची चौकशी करुन त्यांना नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या आरोपींकडून पोलिसांनी ४२ बँक पासबुक, ७० डेबीट कार्ड, ३६ सिमकार्ड, २३ मोबईल फोन, ३ लॅपटॉप, १ टॅब, १२ बँक किट, एक कार असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या डिजीटल साहित्यांचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर ही टोळी काही सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. ही टोळी ऑनलाईन गेमिंग, क्रिकेट बेटींग आणि कॅसिनोच्या नावाने अनेकांना गंडा घालत होती. या ठगांना ही टोळी म्युल बँक खाती पुरविण्याचे काम करत होती.

या टोळीने आतापर्यंत विविध बँकेत ११० खाती उघडले असून त्यापैकी सतरा बँक खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झालील आहे. या खात्यात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर देशभरात ३८ सायबर गुन्ह्यांत त्याचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. त्यात महाराष्ट्रातील खांदेश्‍वर, नारपोली पोलीस ठाणे, कर्नाटक नऊ, तेलंगणा सहा, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश व दिल्ली प्रत्येकी दोन, उत्तरप्रदेश पाच, जम्मू-काश्मीर एक आणि कोलकात्याच्या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीने मुंबईसह देशभरातील विविध राज्यात फसवणुकीसाठी सायबर ठगांना म्युल बँक खाती पुरविले होते.

प्राथमिक तपासात ज्या सतरा बँक खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यात अवघ्या दिड ते दोन महिन्यांत २५ कोटी ४५ लाख रुपयांचे आर्थिक उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रक्कमेच्या स्त्रोत, व्यवहाराची दिशा, लाभार्थी खाती, संबंधित व्यक्ती तसेच सायबर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याकामी तिन्ही आरोपींना मुख्य सायबर ठगांकडून लाखो रुपयांचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांना इतर पाचजणांची मदत केली असून त्यांचे नावे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page