कांदिवलीतील दोन कारखान्यातून तेरा बालकामगारांची सुटका

कारखान्याच्या मालकासह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – कांदिवलीतील दोन कारखान्यात मंगळवारी चारकोप पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तेरा आणि सतरा वयोगटातील तेरा बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कारखान्याच्या मालकासह चालकाविरुद्ध पोलिसांनी अल्पवयीन न्याय आणि बालकामगार कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अंकितकुमार महेंद्र रावल आणि समीनूर मोतीआर रेहमान शेख अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून अनेक अल्पवयीन मुलांना विविध कामाचे आमिष दाखवून मुंबईत आणून त्यांना वेगवेगळ्या आस्थानपामध्ये कामाला ठेवले जात होते. कमी पगार देऊन या मुलांकडून त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक काम करुन घेतले जात होते. त्यामुळे अशा आस्थानपाविरुद्ध कारवाई करुन तिथे काम करणार्‍या बालकामगार मुलांची सुटका करण्याचे आदेश वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते. या आदेशानंतर सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकामगाराच्या सुटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना कांदिवलीतील चारकोप परिसरातील एका इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार काम करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकाळजे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकाळजे, अंमलदार मनिषा कर्‍हे, संतोष तरडे, संजय पाटील, सतीश पवार यांनी कांदिवलीतील चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट, गरुडा पेट्रोलपंपाच्या मागील पहिल्या मजल्यावर असलेल्या अलंकित क्रिएशन, जाहरा फॅशन एरा येथे छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी तेरा ते सतरा वयोगटातील तेरा बालकामगारांची सुटका केली. ते सर्वजण कोलकाताचे रहिवाशी आहे. या कंपनीचे मालक अंकितकुमार रावल आणि चालक समीरनूर शेख यांनी त्यांना तिथे कामावर ठेवले होते. या सर्व बालकामगारांना कष्टांची काम करुन त्यांची शारीरिक छळवणूक आणि पिळवणूक केली जात होती. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला जात नव्हता. त्यांची नीट काळजी घेतली जात नसल्याचे तपासात उघडकीस आले.

तपासात आलेल्या या माहितीनंतर अंकितकुमार रावल आणि समीनूर शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या बालकामगारांची माहिती त्यांच्या पालकांना कळविण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात येणार आहे.

चोरीसह गहाळ झालेले ३८१ मोबाईल मूळ मालकांना परत
दुसर्‍या कारवाईत चारकोप पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेल्या ३८१ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. १ जानेवारी ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत चारकोप पोलिसांनी चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कोटोले, अंमलदार घोसाळकर, पोलीस शिपाई तावरे, मसुब शेख, माळी यांनी चोरीसह गहाळ झालेले मोबाईल मुंबईसह विविध राज्यात जाऊन हस्तगत केले आहे.

२०२० पासून चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २५६० मोबाईल चोरीसह गहाळ झाले आहे. याबाबत तक्रारदारांनी मोबाईल चोरीसह गहाळची तक्रार केली होती. त्यापैकी ९२५ मोबाईल परत मिळवून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले होते. २०२६ साली आतापर्यंत ६७० तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले असून त्यापैकी ३१९ मोबाईल तांत्रिक माहितीवरुन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्यात ऍपल १६, सॅमसंग ६०, ओप्पो ४६, विवो ५६, मोटोरोला ३८ नथिंग २०, पोको २९, रेडमी ४५, टेको १०, गुगल दोन आणि टेक्नोच्या पाच मोबाईल असा ३८१ मोबाईलचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page