धावत्या लोकलमधून दिव्यांग वयोवृद्धाला ढकळून दिले

उपचारादरम्यान वयोवृद्धाचा मृत्यू तर आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२६
मुंबई, – क्षुल्लक वादातून एका ६२ वर्षांच्या कॅजेटन पाल डेनीस पिरीस नावाच्या दिव्यांग वयोवृद्धाला मनोरुग्ण प्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकळून दिले, त्यात जखमी झालेल्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मनोरुग्णाला अटक केली आहे. अमजद सफरुद्दीन शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाच्या सुमारास चर्चगेट-बोरिवली उपनगरीय लोकलच्या माहीम-वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या लोकलमध्ये दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांत लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी क्षुल्लक वादातून एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी चर्चगेट-बोरिवलीच्या उपनगरीय लोकलमध्ये अशाच प्रकारे वाद झाला होता. या लोकलच्या अपंगासाठी असलेल्या राखीव डब्ब्यात कॅजेटन पिरिस आणि अमजद शेख हे दोघेही प्रवास करत होते.

ही लोकल वांद्रे-माहीम रेल्वे स्थानकात असताना या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात अमजदने कॅजेटन यांना चालत्या लोकलमधून बाहेर ढकळून दिले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. ही माहिती नंतर इतर प्रवाशांकडून वांद्रे रेल्वे पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या केजीटन यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चालत्या लोकलमधून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी राजेश चंद्रकांत शिरोडकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अहमद शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी अमजद शेख याला पोलिसांनी अटक केली. कॅजेटन पिरीस हे सांताक्रुज येथील गजझर बांध तर अमजद शेख हा चर्चगेट येथील बाबादिन दर्गा, बॉम्बे हॉस्पिटल फुटपाथवर राहतो. तो मजुरीचे काम करत असून मनोरुग्ण असल्याचे बोलले जाते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, वरिष्ठ पपोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही डावेकर, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के जाधव, सहाय्यक फौजदार एम. के जाधव, पोलीस हवालदार कोळसे, सावंत, कांबळे, मोरे, पोलीस शिपाई सकट, भारुड, कदम, आरकड, शेजवळ, काकडे, जाधव, घेवडे, गर्जे, पाटील, भांगे, जाधव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page