नजर काढण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन महिलेवर अत्याचार

गुन्हा दाखल होताच चार तासांत २८ वर्षांच्या बहुरुप्याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – नजर काढण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश केलेल्या एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर लैगिक अत्याचार करुन पलायन केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अनिल शेषराव शिंदे नावाच्या एका २८ वर्षांच्या बहुरुप्याला पवई पोलिसांनी अटक केली. अनिल हा तृतीयपंथी बनवून पिडीत महिलेच्या घरी आला होता, घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत महिला पवई परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. मंगळवारी १८ ऑगस्टला दुपारी सव्वाबारा वाजता तिच्या घराजवळ अनिल नावाचा एक तृतीयपंथी आला होता. त्याने नजर काढण्याचा बहाणा करुन तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी तिच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्याने तिला बेडरुममध्ये आणले. तिथे आल्यानंतर त्याने तिला बरे-वाईट करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होूता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तो घरातून पळून गेला होता. या प्रकाराने पिडीत महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तरीही तिने स्वतला सावरत पवई पोलीस ठाणे गाठले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशखमु, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत बडगर, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पिंजरकर, पोलीस हवालदार टिळेकर, झेंडे, नलावडे, पोलीस शिपाई शेट्टी यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.

या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अवघ्या चार तासांत पोलिसांनी कळवा येथील एका झोपडपट्टीतून अनिल शिंदे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच तृतीयपंथीचा पोशाख घालून महिलेच्या घरात नजर काढण्याचा बहाणा करुन प्रवेश केल्याचे तसेच नंतर तिला धमकावून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पवई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अनिल हा तृतीयपंथी नसून भीक मागणारा बहुरुपी असल्याचे उघडकीस आले. तो सध्या कळवा येथील खारेगाव, गोलाई देवी मंदिराजवळील गोलाईनगरात राहत असून भिक्षा मागण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page