मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत पाचजणांचा मृत्यू झाला. त्यात दोन अल्पवयीन मुलांसह एका तरुणी आणि दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी माटुंगा, बोरिवली, वांद्रे, घाटकोपर आणि चेंबूर पोलिसांनी पाच स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मृतांमध्ये गणेश सुनिल महामूनी, अंश रविंद्र गुप्ता, तेजल विजय मेहता, धनश्री बाबासाहेब डोंगरे आणि मैनाबिबी गोाम शेख यांचा समावेश असून यातील गणेश आणि अंश हे दोघेही चौदा आणि आठ वर्षाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात रविवारी ३० ऑगस्टला सकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घाटकोपर येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, जागृती नगर मेट्रो स्टेशनजवळ झाला. सुनिल नारायण महामूनी हा माथाडी कामगार घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहतो. चौदा वर्षांचा मृत गणेश हा त्यांचा मुलगा असून तो सध्या नववीत शिकतो. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी ऍक्टिव्हा बाईक घेतली होती. रविवारी सकाळी सव्वापाच वाजता गणेश हा त्याचा मित्र आर्यनसोबत ऍक्टिव्हा बाईकवरुन जात होता. जागृती नगर मेट्रो स्टेशनजवळ त्यांच्या बाईकला भरवेगात जाणार्या एका टेम्पोने धडक दिली होती. अपघातात जखमी झालेल्या गणेशला स्थानिक लोकांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर टेम्पोचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या टेम्पोचालकाचा शोध सुरु केला आहे.
दुसरा अपघात रविवारी ३० ऑगस्टला दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास वांद्रे येथील जॉन बाप्टिस्ट रोड, जिजामाता गार्डनसमोर झाला. अंश हा दुपारी जिजामाता गार्डनसमोर रस्ता क्रॉस करत होता. यावेळी मोबाईलवर बोलत मेघा रावल ही तिची इनोव्हा कार भरवेगात चालवत होती. तिला अंशचा अंदाज आला नाही, त्यामुळे तिने त्याला जोरात धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून एका आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मेघा रावल हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली.
तिसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता चेंबूर येथील सुभाषनगर बसस्टॉपसमोर झाला. मानस बाबासाहेब डोंगरे हा तरुण गोवंडीतील गौतमनगर येथे त्याच्या आई-वडिल आणि २५ वर्षांची बहिण धनश्रीसोबत राहतो. शुक्रवारी तो धनश्रीसोबत नवीन घेतलेले कपडे बदलण्यासाठी त्याच्या बाईकवरुन जात होता. ही बाईक सायंकाळी सहा वाजता सुभाष नगर बसस्टॉपजवळ येताच एका हेव्ही वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. जखमी धनश्रीवर झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मानस डोंगरे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रक्षाबंधनाच्या आदल्याच दिवशी बहिणीचा अपघाती मृत्यू झाल्याने गौतमनगरातील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
चौथ्या अपघातात एका ४६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. मृत मैनाबिबी ही मूळची कोलकाताची रहिवाशी असून ती सध्या ऍण्टॉप हिल परिसरात राहत होती. ती सध्या भायखळा येथे घरकाम करत होती. शुक्रवारी रात्री ती नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाली. यावेळी तिला एका बाईकस्वाराने लिफ्ट दिली होती. ही बाईक वडाळा येथील चार रोड, कॅफे हसन हॉटेलजवळून जात असताना एका टँकरने तिला धडक दिली होती. त्यात टँकरच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री साडेनऊ वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तिची मुलगी जस्मीना खातून गुलाम शेख हिच्या तक्रारीवरुन माटुंगा पोलिसांनी आरोपी टँकर आणि बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही अपघातानंतर पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पाचव्या अपघातात तेजल मेहता या महिलेचा मृत्यू झाला. तेजल ही तिच्या कुटंबियांसोबत बोरिवली परिसरात राहत होती. १२ ऑगस्टला त्यांची पत्नी तेजल मेहता ही दशमाता देवीची मूर्ती आणण्यासाठी बोरिवली येथे जात होती. सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ती आर. एम भट्टड, सुमेरनगर जंक्शनसमोरुन जात होती. यावेळी बोरिवली पूर्वेकडून पश्चिमकडे जाणार्या एका रुग्णवाहिनेने एका कारला जोरात धडक दिली. या कारने तेजलला जोरात धडक दिली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर अरिहंत आणि नंतर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. १६ ऑगस्टला तिचा मृत्यू झाला. सर्व विधी पार पाडल्यानंतर तेजलचा पती विजय चिमनलाल मेहता यांनी बोरिवली पोलिसांत आरोपी रुग्णवाहिका अरविंद सुरेश चव्हाण आणि कारचालक मिहीर हितेश जैन या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.