पत्ता बदलण्यासाठी लिंक पाठवून आर्मीच्या सुभेदाराची फसवणुक

पुण्यातून २४ वर्षांच्या तरुणाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – पत्ता बदलण्यासाठी लिंक पाठवून आर्मीच्या एका सुभेदाराची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी पुण्याच्या एका २४ वर्षांच्या तरुणाला कफ परेड पोलिसांनी अटक केली. अनिकेत बळीराम गायकवाड असे या आरोपी तरुणाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने फसवणुकीसाठी गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्याने इतरांना बँक खाती उघडण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

अखिलेशकुमार सिंग हे कफ परेड येथील नेव्हीनगर सुविधा गेट परिसरात राहत असून आर्मीमध्ये सुभेदार म्हणून काम करतात. २०२२ ते २०२५ या कालावधीत ते जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांनी पिस्तूलचे लायसन्ससाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांनी त्यांचे पार्सल त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर पाठविण्याची विनंती केली होती. २१ जुलैला ते कफ परेड येथील राहत्या घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो डीटीडीसी कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांचे पार्सल दुसर्‍या पत्त्यावर गेले आहे. पत्ता बदलण्यासाठी त्याने त्यांना ऑनलाईन प्रोसेसिंग करण्यास सांगितले. त्यासाठी त्याने त्यांना एक लिंक पाठविली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी लिंक ओपन करुन त्यात त्यांची वैयक्तिक माहिती भरली होती.

याच दरम्यान त्याने त्यांना आरटीओ चलनचे एक ऍप पाठवून त्यांना ते ऍप ओपन करण्यास प्रवृत्त केले. ते ऍप ओपन होताच त्याने त्यांचा मोबाईलचा ताबा घेतला आणि त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७० हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केला होता. बँकेतून पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांनी घडलेला प्रकार कफ परेड पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कफ परेड पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ते बँक खाते अनिकेत नावाच्या एका व्यक्तीचे होते. तो पुणे येथे राहत असल्याचे उघडकीस आले.

या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत शिंदे, अश्‍विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र काळे, प्रदीप बोरसे, पोलीस हवालदार अनिल उदागे, अमर देशमुख, वसीम शेख आदी पथकाने शनिवारी पुण्यातून अनिकेत गायकवाड ला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अनिकेत हा पुण्याच्या दत्तनगर, गणेश हाईट इमारतीमध्ये राहतो.

अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात विविध व्यक्तींच्या बँक खात्यासंदर्भातील कागदपत्रे आढळून आले. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरविली होती. स्वतसह त्याने इतरांना बँक खाती उघडण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page