महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डच्या तोतया अधिकार्‍याला अटक

कारवाईची धमकी देऊन दहा हजाराची वसुली करुन पुन्हा खंडणीसाठी धमकी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ऑगस्ट २०२६
मुंबई, – खंडणीच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डचा तोतया फिल्ड अधिकारी सचिन महाडिक ऊर्फ स्वराज प्रदीप घोसाळकर याला वनराई पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध खंडणीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार व्यावसायिकाकडून दहा हजाराची खंडणी वसुली केल्यानंतर त्याने इतर अधिकार्‍याच्या नावाने पुन्हा खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

शैलेश सुरेश पोवळे हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांची लक्ष्मी मेटॅलर्जीकल ऍण्ड मरिन इंजिनिअर नावाची एक कंपनी गोरेगाव येथील आय. बी रोड, कोठारी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. २५ ऑगस्टला ते त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी तिथे एक व्यक्ती आला होता. त्याने तो महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्डचा फिल्ड अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्याने स्वतचे नाव सचिन महाडिक असल्याचे सांगून त्यांना त्याचे एक व्हिझीटिंग कार्ड दिले होते. त्यात त्याचे नाव सचिन महाडिक, त्यावर महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड, पत्ता कल्पतरु पॉईट, तिसरा मजला, पीव्हीआर समोर, सायन असे नमूद केले होते.

त्यांनी त्याला आधी दुसरे अधिकारी येत असल्याचे सांगितले असता त्याने तो आणि विक्रम माने असे दोघेजण आता येणार असल्याचे सांगतले. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या कंपनीकडून होणार्‍या प्रदुषणाबाबत काही तक्रारी असल्याने त्यांच्याविरुद्ध चुकीचा रिपोर्ट बनविणार असल्याची धमकी दिली. हा रिपोर्ट न बनविण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी शैलेश पोवळे यांनी याआधी कुठल्याही अधिकार्‍यांनी पैशांची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने त्यांना पैसे दिले नाहीतर पुढील परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा असे सांगून त्यांच्याकडून पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी त्याला दहा हजार रुपये दिले.

ही रक्कम घेतल्यानंतर तो तेथून निघून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मनपा सल्लागार कैलास माने यांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच त्यांच्याकडे सचिन महाडिक नावाचा कोणीही अधिकारी महाराष्ट्र प्र्रदुषण नियंत्रण बोर्डमध्ये कामाला आहे का याबाबत विचारणा केली. काही वेळानंतर त्यांनी विक्रम माने यांच्याकडे याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी सचिन महाडिक नावाचा कोणीही अधिकारी त्यांच्याकडे कामाला नसल्याचे सांगितले. त्याच रात्री नऊ वाजता सचिन महाडिकने त्यांना कॉल केला. त्याने त्यांचे साहेब एसआरओ शकील शेख आणि आरओ सुचित ढोलान यांच्यासोबत बोलणे झाले असून त्यांनाही २५ हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. यावेळी शैलेश पोवळे यांनी दोन्ही साहेबांना घेऊन कार्यालयात या, तुम्हाला पैसे मिळतील असे सांगितले.

त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांना तीन वर्षांचा क्लिअरन्स देतो असे सांगून गुगल पेद्वारे बारा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. यावेळी त्यांनी ऑनलाईन पेमेंट देण्यास नकार देत त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सचिन महाडिक तिथे आला होता. यावेळी शैलेश पोवळे यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती सांगून पोलीस मदतीची विनंती केली होती. या विनंतीनंतर वनराई पोलिसांचे पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी सचिन महाडिक नाव सांगणार्‍या स्वराज घोसाळकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डशी काहीही संबंध नाही, केवळ पैसे उकाळण्यासाठी तो तिथे आला होता. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्याने पुन्हा त्यांना कॉल करुन आणखीन पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी शैलेश पोवळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्वराज घोसाळकर याच्याविरुद्ध तोतयागिरी करुन खंडणीची मागणी करणे, खंडणी स्वरुपात दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अअकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page