मनपा अधिकारी-कर्मचारी असल्याची बतावणी करुन फसवणुक
दोन आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा खैरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अमीत संभाजी कुळये, सुधीर दयानंद पुजारी आणि विनोद गणेश सदर अशी या तिघांची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील दोन बाईक आणि १० हजार ८५० रुपयांची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. दोन आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
जुबीन मुकेश शहा हे व्यावसायिक असून ते घाटकोपर परिसरात राहतात. मंगळवारी रात्री ते अंधेरी येथून रिक्षाने जात होती. रात्री पावणेअकरा वाजता ही वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील वाकोला ब्रिज, हंसभूजा जंक्शनजवळ आली होती. यावेळी दोन अज्ञात व्यक्तीने त्यांची रिक्षा अडविली. त्यांनी त्यांना रिक्षात सिगारेट ओढत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची धमकी दिली. त्यांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे मनपाच्या ओळखपत्राची मागणी केली होती. त्याचा राग आल्याने त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली होती.
काही वेळानंतर त्यांचा तिसरा सहकारी तिथे आला आणि त्याने १९ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले. त्यांच्याकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी त्यांना चौकीजवळ येण्यास सांगून ते तिघेही बाईकवरुन पळून गेले होते. या प्रकारानंतर त्यांनी खैरवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही तोतया मनपा अधिकारी आणि कर्मचार्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पहाणी केल्यानंतर तिन्ही आरोपींची ओळख पटली होती. ते तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होते.
ते तिघेही पवई परिसरात असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हवालदार ठोंबरे, ठाकरे, पोलीस शिपाई जाधव आणि कांबळे यांनी पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रनोद माने, पोलीस हवालदार झेंडे आणि पोलीस शिपाई राठोड यांच्या मदतीने अमीत कुळये, सुधीर पुजारी आणि विनोद सदर या तिघांनाही पवई परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली
तिन्ही आरोपी पवईतील आरे कॉलनी, मिलिंदनगरातील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील दोन बाईकसह फसवणुकीची रक्कम हस्तगत केली. यातील अमीतविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात पाच, जुहू पोलीस ठण्यात एक असे सहा गुन्हे, विनोद सदरविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.