प्रोजेक्टसाठी खंडणीची मागणी करणार्‍या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

४१ लाख रुपये देऊन खंडणीसाठी धमकी देत असल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – गोवा येथे सुुरु असताना बहुचर्चित गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका नामांकित बांधकाम कंपनीच्या अधिकार्‍याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पाचजणाच्या टोळीविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात सिद्धेश जना तारी, प्रितेश साळगावकर व अन्य तिघांचा समावेश आहे. सिद्धेश आणि प्रितेशला कंपनीने आतापर्यंत ४१ लाख रुपये खंडणी स्वरुपात दिले होते, तरीही त्यांच्याकडून कंपनीच्या अधिकार्‍यांना खंडणीसाठी सतत धमकी दिली जात आहे. या धमक्यांना कंटाळून कंपनीने पोलिसांत तक्रार करुन दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.

३९ वर्षांचे तक्रादार लोअर परेल येथे राहत असून एका नामांकित खाजगी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीत लायझनिंगचे काम करतात. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय महालक्ष्मी येथे असून कंपनीकडून देशभरात कन्स्ट्रक्शनसह प्लॉटिंग, डेव्हलपींगचे काम चालते. त्यात गोवा येथील विविध गृह प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रोजेक्टसाठी त्यांना कंपनीने उर्वरित शासकीय परवानगी, प्रोजेक्टशी संबंधित इतर काम सुरळीत पार पाडण्यासाठी दिले होते. तिथे काम करताना त्यांची सिद्धेश तारी आणि प्रितेश साळगावकरशी त्यांचा वाद झाला होता. ते स्थानिक लोकांवर अन्याय करत असून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या कंपनीला तिथे काम करु देणार नाही अशी धमकी दिली होती. यावेळी त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

तुमचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ देणार नाही. ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला कशी मदत करतात ते आम्ही बघून घेतो, आमच्याशिवाय तिथे काम करुन दाखवाच. कारापूर येथील आंदोलन आमच्या सांगण्यावरुन सुरु आहे. त्यामुळे आम्ही सांगू तसेच काम करावे लागेल. नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. आमच्या नादाला लागू नका, त्याची तुम्हाला चांगलीच किंमत मोजावी लागेल अशी वारंवार धमकी देत होते. यावेळी तक्रारदारांनी त्यांना शांत राहून आपण चर्चेतून मार्ग काढू असे सांगितले. यावेळी या दोघांनी त्यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटीची मागणी केली होती. यावेळी त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून चर्चा करतो असे सांगितले.

संबंधित प्रकरण गंभीर असल्याने तक्रारदारांनी लागलीच ही माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली होती. यावेळी वरिष्ठांनी आपले प्रोजेक्ट कायदेशीर मार्गाने सुरु असल्याने त्यांना तीन कोटी रुपये देण्याचा प्रश्‍नच येत नाही असे सांगून त्यांना प्रकरण हाताळण्याची परवानगी दिली. यावेळी त्यांनी सिद्धेश आणि प्रितेश यांची भेट घेऊन प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले तसेच उर्वरित रक्कम लवकर देण्याचे आश्‍वासन दिले होते. यावेळी या दोघांनी त्यांना यापुढे त्यांच्या प्रोजेक्टला विरोध करणार नाही तसेच कारापूर येथील आंदोलनही मागे घेतो असे सांगितले.

काही दिवसांनी त्यांनी त्यांना पुन्हा कॉल करुन इतर लोकांनाही पैसे द्यावे लागणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे तक्रारदारानी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून मे २०२६ पर्यंत सिद्देश तारी याला ३४ लाख आणि प्रितेश ७ लाख रुपये दिले होते. तरीही ते दोघेही त्यांच्याकडे सतत खंडणीसाठी धमकी देत होते. त्यामुळे तक्रारदारसह त्याचे सहकारी मुंबईत निघून आले होते. १२ ऑगस्टला तक्रारदार त्यांच्या कार्यालयात होते, यावेळी त्यांनी त्यांना कॉल करुन खंडणीची मागणी केली होती.

सततच्या खंडणीच्या धमकीला कंटाळून तक्रारदारांनी वरिष्ठांच्या आदेशावरुन ना. म जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सिद्धेश तारी, प्रितेश साळगावकर व इतर तिघांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी एक टिम लवकरच मुंबईबाहेर जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page