स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला ४० लाखांना गंडा
वॉलेटमध्ये युएसडीटी पाठविल्याचा बोगस स्क्रिनशॉप पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने एका तरुण व्यावसायिकाची सुमारे ४० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी समीर ऊर्फ सलमान या मुख्य आरोपीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने वॉलेटमध्ये युएसडीटी पाठविल्याचा बोगस स्क्रिनशॉट पाठवून या व्यावसायिकाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला, इतकेच नव्हे तर तो बोगस पोलीस रेड टाकून त्याच्या सहकार्याच्या मदतीने पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. समीरसह इतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आग्रीपाडा येथे राहणारे माझ मोहम्मद अन्सारी हे व्यावसायिक असून त्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. मे २०२६ रोजी त्यांची ओम नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान ओमने त्यांना त्याच्याकडे युएसडीटीच्या सध्याच्या मार्केटपेक्षा कमी दर देणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना कधीही युएसडीटीची गरज असल्यास त्यांना सांगण्याची विनंती केली होती. जून महिन्यांत त्यांनी ओमला त्यांच्या मित्रांसोबत नागपाडा येथे बोलाविले होते. तिथे त्यांची ओमने सुफियान आणि समीर ऊर्फ सलमानशी ओळख करुन दिली होती. या दोघांनी युएसडीटीचा सध्या मार्केट रेट ९८ रुपये असून तो त्यांना ९७ रुपयांच्या दराने युएसडीटी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करण्यास होकार दर्शविला होता.
यावेळी माझ मोहम्मदने त्याला ४० लाख रुपये युएसडीटीमध्ये गुंतवणुक करणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीचे कोणतेही ऍप नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचा दुबईत राहणारा मित्र हैदरअली शकील बेग याच्या वॉलेटमध्ये युएसडीटी पाठविण्यास सांगितले होते. ११ जूनला विलेपार्ले येथील वॉफल कॅसल कॅफेमध्ये त्यांनी समीर ऊर्फ सलमानला ४० लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी समीरच्या सांगण्यावरुन तीन वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यामोबदल्यात तो त्यांना ४१ हजार युएसडीटी रुपांतर करुन देणार होता. काही वेळानंतर समीरने एका व्यक्तीला कॉल करुन पैसे आल्याची खात्री करुन घेतली.
काही वेळानंतर त्यांनी त्यांना ४१ हजार युएसडीटी त्यांच्या वॉलेटमध्ये आल्याचा व्हॉटअपवर स्क्रिनशॉट पाठवून दिले होते. मात्र त्याने पाठविलेला स्क्रिनशॉट बोगस होता. याच दरम्यान तिथे दोन व्यक्ती आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन समीरला त्याच्या मोबाईलसह ताब्यात घेतले. या प्रकाराने माझ मोहम्मद प्रचंड घाबरले, त्यामुळे ते त्यांचे सहकारी हैदरअली बेन, ओम, सुफियान यांच्यासोबत तेथून निघून गेले. या घटनेनंतर त्यांनी समीरला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. स्वस्तात युएसडीटी देण्याचे आमिष दाखवून समीरने त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून समीर ऊर्फ सलमानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. समीरने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.