फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड फ्लॅटमालकाला एक वर्षांनी अटक

फ्लॅटसाठी घेतलेल्या सोळा लाखांचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – फ्लॅट फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपी फ्लॅटमालकाला एक वर्षांनी कांदिवली पोलिसांनी अटक केली. राजकुमार राजवल्ली पाठक असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रविंद्र वणवे ऊर्फ दिपक वणवे हा सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

उर्मिला कौशिक वाघेला ही महिला कांदिवलीतील इराणीवाडी, सिद्धीविनायक अपार्टमेंटमध्ये तिच्या आई आणि मुलासोबत राहत असून ती घरकाम करते. तिच्याच शेजारी रविंद्र वणवे हा राहत होता. लहानपणापासून ते शेजारी राहत असल्याने एकमेकांच्या परिचित होते. तो ब्रोकर म्हणून काम करत असल्याने तो त्यांना भाड्याने घर देत होता. तीन वर्षांपूर्वी तिची आई मंगुला गिरीधर सोलंकीने तिचे गावातील घराची तीस लाखांमध्ये विक्री केली होती. ही रक्कम तिच्या आईने तिच्यासह तिच्या भावाला दिली होती. या दोघांनाही प्रत्येकी पंधरा लाख रुपये मिळाले होते. याच पैशांतून तिला एक फ्लॅट घ्यायचा होता, त्यामुळे तिने रविंद्रला एसआरएमध्ये एक फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिला कांदिवलीतील डहाणूकरवाडी, प्रसाद एसआरए इमारतीमध्ये एक रुम विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते.

हा रुम राजकुमार पाठक याच्या मालकीचा होता. २२ मजल्याच्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते, त्यामुळे तिने दुसर्‍या मजल्यावरील एक सॅम्पल फ्लॅटची पाहणी केली होती. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर २२०४ क्रमांकाचा फ्लॅट राजकुमारचा होता. मात्र तो फ्लॅट बंद होता. एक आठवड्यात चावी मिळेल असे सांगून त्याने तो फ्लॅट सॅम्पल फ्लॅटप्रमाणे असल्याचे सांगितले होते. डिसेंबर २०२३ त्याने तिची राजकुमारशी ओळख करुन दिली. यावेळी त्यांच्यात फ्लॅटविषयी चर्चा झाली, चर्चेअंती त्यांच्यात २६ लाखांमध्ये फ्लॅट खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. यावेळी रविंद्रने तिच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्या होत्या. तो तिच्या परिचित असल्याने तिने त्याच्यावर विश्‍वास ठेवून कागदपत्रांवरुन स्वाक्षरी केली होती.

ठरल्याप्रमाणे तिने रविंद्र आणि राजकुमार यांना सोळा लाख रुपये दिले होते. यावेळी या दोघांनी निवडणुकीमुळे फ्लॅटचा ताबा उशिराने मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटचा ताबा मिळण्यास उशीर होत असल्याने तिने फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला प्रत्येकी चार लाखांचे चार धनादेश दिले होते, मात्र ते चारही धनादेश बँकेत न वटता परत आले. वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले सोळा लाख रुपये परत केले नाही.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच उर्मिला वाघेला हिने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रविंद्र वणवे आणि राजकुमार पाठक या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. याच गुन्ह्यांत राजकुमार हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या राजकुमार पाठकला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. फ्लॅटच्या आमिषाने राजकुमारने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page