एम/पश्‍चिम वॉर्डच्या दोन पालिका अधिकार्‍यांना लाच घेताना अटक

१.७० लाखांची लाचेची मागणी करुन ऐंशी हजार घेताना कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ सप्टेंबर २०२६
मुंबई, – कारवाईत जप्त केलेली हातगाडीसह भंगार साहित्य गोदामातून बाहेर काढण्यासाठी एक लाख सत्तर हजाराची लाचेची मागणी करुन ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना महानगरपालिकेच्या दोन अधिकार्‍यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. वरिष्ठ निरीक्षक रमेश गोपाळ साळवे आणि कार्यकारी सहाय्यक विजय सिताराम ठाकरे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सध्या चेंबूर येथील महानगरपालिकेच्या एम/पश्‍चिम वॉर्डच्या अनुज्ञापन खात्यात कार्यरत आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले असून या दोघांनाही शनिवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

यातील ३६ वर्षांचे तक्रारदार भंगार व्यावसायिक आहे. काही दिवसांपूर्वी एम/पश्‍चिम वॉर्डने एका कारवाईत त्यांची हातगाडी, भंगार साहित्य जप्त केले होते. जप्त केलेले साहित्य नंतर मनपाच्या गोदामात ठेवण्यात आले होते. ते साहित्य गोदामातून बाहेर काढून देण्यासाठी त्यांनी वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यासह कार्यकारी सहाय्यक विजय ठाकरे यांनी त्यांच्याकडे एक लाख सत्तर हजाराची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांच्यात चर्चेअंती ऐंशी हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या दोन्ही अधिकार्‍यांविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक् विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी ३ सप्टेंबरला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी विजय ठाकरे यांनी लाचेचा ऐंशी हजाराचा पहिला हप्ता स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून येताच सहाय्यक पोलीस आयुक्त शुभदा मोरे, पोलीस निरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार अरुण पाडाळे, गणेश साटम, सुनिल रावराणे, पोलीस शिपाई देवीदास दराणे, शितल बाबर, महिला पोलीस शिपाई सोनाली साळवी, पोलीस शिपाई चालक प्रकाश गाराळे, ज्ञानेश्‍वर साबळे आदी पथकाने एम/पश्‍चिम कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून विजय ठाकरे यांनी ऐंशी हजाराची लाच घेतली होती.

ही लाच मिळाल्यानंतर त्यांनी रमेश साळवे यांना कॉलवरुन माहिती दिली होती. यावेळी विजय ठाकरे आणि नंतर रमेश साळवे या दोघांनाही या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्यांना शनिवारी सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page