कारच्या धडकेने २० वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

अपघाताला जबाबदार असलेल्या कारचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२६
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या कारच्या धडकेने एका २० वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. शुभम प्रजापती असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी युवराज राजकुमार बाहेती याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले.

ही घटना शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस. व्ही रोडच्या ब्रिजवरील दक्षिण वाहिनीवर घडली. शुक्रवारी रात्री उशिरा वांद्रे पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते.रात्री पावणेअकरा वाजता या पथकाला मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून वांद्रे येथील सी लिंक रेक्लेमेशन, कोस्टल हायवे, एस. व्ही. रोडच्या ब्रिजवरवर अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस पथक तिथे गेले होते. घटनास्थळी पोलिसांना एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले.

त्याच्या बाजूला त्याची बाईक पडली होती. त्यामुळे या पथकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या या तरुणाला तातडीने जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत तरुणाचे शुभम प्रजापती असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडील आधारकार्डवर त्याची ओळख पटली होती. शुक्रवारी रात्री तो त्याच्या बाईकवरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या कारने त्याच्या कारला धडक दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान अपघातानंतर कारचालक पळून न जाता तिथे थांबला होता. त्यामुळे त्याला वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याचे नाव युवराज बाहेती असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा बुलढाणाचा रहिवाशी असून सध्या लोअर परेल परिसरात राहतो. ओव्हरटेक करताना त्याने बाईकला धडक दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकणी युवराजविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक करुन त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page