बोगस फेसबुक पेजच्या माध्यमातून चांगल्या परताव्याच्या आमिषाने गंडा

महिलेला गंडा घालणार्‍या दोन मुख्य आरोपींना राजस्थानातून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२६
मुंबई, – विझार्ड ट्रेडर्स सेव्हन नावाने बोगस फेसबुक पेज तयार करुन गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्‍या एका टोळीचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत टोळीच्या दोन म्होरक्यांना राजस्थान येथून पोलिसांनी अटक केली. दिपक सिताराम मिना आणि हरकेश गोपाल मिना अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे अकरा वापरलेले सिमकार्ड, डेबीट कार्ड आणि पेटीएम कंपनीचे क्यूआर स्कॅनर आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहते. १२ जुलैला ती तिच्या मोबाईलवर फेसबुक पाहत होती. सर्फिंग करताना तिला विझार्ड ट्रेडर्स सेव्हन नावाचा एक फेसबुक पेज निदर्शनास आला होता. त्यात एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने ९९ रुपये भरल्यास त्यांना ९९९९ रुपये मिळतील असे नमूद केले होते. त्यामुळे तिने संबंधित वेब पेज ओपन करुन हाय मॅसेज केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तिला रिप्लाय देताना तिला काही योजनांची माहिती दिली. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने त्याला जीपेद्वारे ९९ रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर आरोपींनी तिला वेगवेगळ्या मोबाईलवर संपर्क साधून २२ ट्रान्झेंशनद्वारे आणखीन ७३ हजार ५२१ रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले.

ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तिला मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मिळाली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी गंभीर दखल घेत ओशिवरा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक प्रभात मानकर, सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सरदेसाई, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत, सुहास शिंदे यांनी तपास सुरु केला होता.

विझार्ड ट्रेडर्स सेव्हन या बोगस पेजची माहिती घेताना संबंधित गुन्ह्यांतील आरोपी राजस्थानात सक्रिय असल्यासची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर तिथे सायबर सेलचे पथक गेले होते. गेल्या चार दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते, मात्र ते दोघेही प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ा पथकाने जयपूरच्या दौसा परिसरातून दिपक मिना आणि हरकेश मिना या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आयफोन, एक ओपो कंपनीचा मोबाईल, अकरा वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड, डेबीट कार्ड आणि पेटीएम क्यूआर स्कॅनर ताब्यात घेतले आहे. ते दोघेही मूळचे राजस्थानच्या दौसा आणि सितापुराचे रहिवाशी आहे.

काही महिन्यांपूर्वीच त्यांनी विझार्ड ट्रेडर्स सेव्हन नावाचे एक बोगस फेसबुक पेज तयार केले होते. या पेजच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. फसवणुकीच्या रक्कमेचा अपहार करुन ते सिमकार्ड बंद करत होते. या दोघांनी आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page