मुंबई उच्च न्यायालयाच्या असोशिएट पदाच्या परिक्षेत कॉपीचा प्रकार उघड

सातार्‍याच्या २९ वर्षांच्या परिक्षार्थी उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मुंबई उच्च न्यायालयाच्या असोशिएट पदाच्या परिक्षेसाठी कॉपी करताना एका २९ वषा्रंच्या उमेदवाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना माटुंगा येथील राजा शिवाजी विद्यालयात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिन संजय पवार या परिक्षार्थी उमेदवाराविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

ई. बी शिवकुमार हे डोबिवली येथे राहत असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त प्रबंधक म्हणून काम करतात. मुंबई उच्च न्यायालयात असोशिएट पदाच्या परिक्षेसाठी न्यायाधिशांची एक कमिटी असते. या कमिटीमार्फतच सर्व परिक्षांचे देखरेख केली जाते. रविवारी ६ सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत माटुंगा येथील राजा शिवाजी विद्यालयात असोशिएट पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. तिथेच शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक परिक्षा हॉलमध्ये परिक्षा सुरळीत सुरु आहे का, प्रश्‍नपत्रिका वेळेत वाटप होण्यासाठी देखरेख करणे, एखादा विद्यार्थी परिक्षेत कॉपी करत असल्यास तसा सुपरवायझर यांच्याकडून अहवाल प्राप्त करुन वरिष्ठांच्या आदेशावरुन कारवाई करणे आदी कामाची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

परिक्षेच्या उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी करणे हा गुन्हा असल्याचे लेखी नमूद करण्यात आले होते. या परिक्षेसाठी सचिन पवार हा तरुण आला होता.तो परिक्षा केंद्राच्या हॉलमधील ३१६ मध्ये परिक्षा देत होता. परिक्षा देताना त्याची हालचाल संशयास्पद दिसून आली होती. त्यामुळे परिक्षा हॉलमध्ये असलेल्या ए. बी शर्मा यांनी त्याला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडे इंग्रजी भाषेत मजकूर असलेल्या बारा चिठ्ठ्या मिळून आल्या. तो परिक्षेत कॉपी करताना मिळून आला होता. त्याची माहिती शिवकुमार यांना देण्यात आली होती.

यावेळी वरिष्ठांच्या आदेशावरुन त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात सचिन पवार याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापिठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कायदा कलमार्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन हा सातारा येथील आयटीआय रोड, गैंडा माळ, मतकर कॉलनीतील रहिवाशी आहे. रविवारी तो मुंबई उच्च न्यायालयाच्या असोशिएट पदाच्या परिक्षेसाठी मुंबईत आला होता. मात्र त्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page