खंडणीसाठी आयटीसह क्राईम ब्रॅचचे अधिकारी सांगून कंपनीत बोगस रेड
वॉण्टेड असलेल्या आयकर विभागाच्या दोन कर्मचार्यासह चौघाना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२६
मुंबई, – आयटीसह क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कारवाई धमकी देऊन अंधेरीतील एका खाजगी कंपनीतील व्यावसायिकाकडे एक कोटीची मागणी केल्याच्या कटातील वॉण्टेड असलेल्या चार आरोपींना अंधैरी पोलिसांनी अटक केली. सुरेश महावीरप्रसाद मिश्रा, सुनिल मनोहर गोरे, जितू ऊर्फ जितेंद्र नामदेव गोरे आणि अशोक विठोबा शिंदे अशी या चौघांची नावे आहेत. यातील सुरेश हा आयकर निरीक्षक तर सुनिल हा कर सहाय्यक म्हणून आयकर विभागात कामाला आहे. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यापूर्वी याच गुन्ह्यांत सहाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यात संतोष उदय खोपटकर, विनय रमेश मोरे, प्रेम किसन बसनानी, प्रज्ञा हरिश माईन, रेश्मा शामराव वारंग आणि सबीना हाफिज शेख यांचा समावेश आहे. या चौघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या दहा झाली आहे.
४९ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत साकिनाका परिसरात राहतात. त्यांचा डोळ्यांची तपासणी आणि ऑपरेशन करण्याच्या मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. अंधेरीतील चकाला परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. १७ जुलैला त्यांच्या कार्यालयात नऊजणांची एक टोळी आली होती. त्यांनी ते आयकरसह गुन्हे शाखेचे अधिकारी असलयाची बतावणी करुन तिथे कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यात पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. तक्रारदाराकडे त्यांनी त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. ही कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडे एक कोटीची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे एक कोटी नसल्याचे सांगून त्यांना कायदेशीर नोटीस देण्यास सांगितले. त्यानंतर त्यापैकी एका व्यक्तीने प्रकरण मोठ्या साहेबांकडे गेल्यास त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होईल अशी धमकी देत पुन्हा एक कोटीची मागणी केली होती.
पैशांची लवकरात लवकर व्यवस्था करा, आम्ही पुन्हा ऑफिसवर येऊ असे सांगून रात्री आठ वाजता ते सर्वजण निघून गेले. चौकशीदरम्यान ही बोगस रेड असल्याचे तसेच त्यांच्या कार्यालयात कोणीही आयकर अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना पाठविण्यात आले नव्हते असे समजले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन महिलांसह नऊजणांविरुद्ध तोतयागिरी करुन कार्यालयात बोगस कारवाई करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वेगवेगळ्या परिसरातून संतोष खोटपकर, विनय मोरे, प्रेम बसनानी, प्रज्ञा माईन, रेश्मा वारंग आणि सबीना शेख या सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत याच टोळीने बोगस रेड टाकून व्यावसायिकाकडून एक कोटीच्या खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्या चौकशीतून इतर चौघांची नावे समोर आली होती. त्यानंतर या पथकाने सुरेश मिश्रा, सुनिल गोरे, जितू मोरे आणि अशोक शिंदे या चौघांना अटक केली. यातील सुरेशआणि सुनिल हे दोघेही आयकर विभाागत कामाला असून आयकर निरीक्षक व कर सहाय्यक म्हणून काम करतात.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर, पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहन सुर्वे, रामेश्वर कर्पे, पोलीस हवालदार हनुमंत पुजारी, पोलीस हवालदार राहुल घडवले, संदीप शिंदे, विवेक म्हात्रे, विशाल पिसाळ, पोलीस शिपाई विजयानंद लोंढे, विजय पाटील, मनिष कांबरी, सुशांत पाटील, हरिदास शिंदे, विनायक गवळी, रामदास घुले, दत्ता टरके, पंडित तिगोटे, नवनाथ तिगोटे, महिला पोलीस शिपाई पडसे यांनी केली.