तीन विविध कारवाईत २ कोटी ८९ लाखांच्या ड्रग्जचा साठा जप्त
पाच आरोपींना एमडी, हेरॉईन व एमडीए पिल्ससहीत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मुंबई शहरात तीन विविध कारवाईत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सहा आरोपींना मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २ कोटी ८९ लाखांचा एमडी, हेरॉईन आणि एमडीए पिल्सचा साठा जप्त केला आहे. सहाही आरोपींविरुद्ध एनडपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींपैकी चौघांना पोलीस तर अन्य एका आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या कारवाईत ऍण्टॉप हिल येथील जीटीबी नगर परिसरात गस्तीदरम्यान दोन संशयितांना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अतिक नबील शेख आणि मंसुर मोहम्मद शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी ४४ लाख रुपयांचे १४७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. १२ सप्टेंबरला सायंाकळी सात वाजता वांद्रे युनिटचे काही अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. ऍण्टॉप हिल येथील जीटीबी नगर परिसरात दोन तरुण संशयास्पद फिरताना दिसले. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना १४७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत ४४ लाख १० हजार रुपये इतकी आहे. चौकशीत ते दोघेही एमडी ड्रग्जची विक्रीसाठी तिथे आले होते, मात्र एमडी ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. तपासात ते दोघेही ऍण्टॉप हिल परिसरात राहत असून त्यांना ते ड्रग्ज त्यांच्या परिचित मित्रांनी विक्रीसाठी दिले होते. या दोघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत उत्तराखंड येथून आणलेल्या हेरॉईनसह दोघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २६२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ७९ लाख रुपये इतकी आहे. दोघांपैकी एक आरोपी न्यायालयीन तर दुसरा आरोपी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत उत्तराखंड येथे राहणार्या काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मालाडच्या मालवणी, खारोडी, अली तलाव रोड परिसरात काहीजण ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी १४ ऑगस्ट २०२६ रोजी या पथकाने अली तलाव रोड, लक्ष्मी नगर, शांती वेल्फेअर सोसायटीजवळ इजाज अफसरअली खान या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दिड लाखांचे ४.९० ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले होते.
चौकशीत त्याला ते हेरॉईन नालासोपारा येथे राहणार्या एका व्यक्तीने दिल्यचे उघडकीस आले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना मरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार रब्बिल शेख, पोलीस शिपाई साजिद शेख, मुदस्सर देसाई, कालिदास खुड्डे, दत्तात्रय गावडे, सुमीत सोरटे, आदित्य राणे आदी पथकाने नालासोपार येथून त्याच्या सहकार्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी २६२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची सुमारे ७९ लाख रुपये इतकी आहे. तपासात त्याने ते हेरॉईन उत्तराखंड येथील हरिद्वार शहरातून आणल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या इतर सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
अन्य एका कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी जोगेश्वरीतील आक्सा मशिद रोड परिसरातून दोन संशयिताना ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एमडीसह एमडीए पिल्स सापडले. चौकशीनंतर त्याच्या घरी आणखीन ड्रग्जचा साठा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या घरातून पोलिसांनी एमडी आणि एमडीए पिल्स जप्त केला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १ कोटी २६ लाखख ४३ हजार रुपयांचे २.०४ ग्रॅम वजनाच्या एमडीए पिल्स, ४१७ ग्रॅम वजनाचे एमडी, २५ हजाराची कॅश अणि एक ऍपल कंपनीचा आयफोन आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक हर्षद जुईकर, राम लिंगे, पोलीस हवालदार पाटील, प्रभू, पोलीस शिपाई गोसावी, सिंह, महिला पोलीस शिपाई ठाकूर यांनी केली.