फेअरप्ले गेमद्वारे पैसे घेऊन फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश
चेंबूरच्या फ्लॅटमध्ये पोलिसांची कारवाई तर मुख्य आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – भारतात प्रतिबंधित असलेले फेअरप्ले गेमद्वारे पैसे घेऊन ऑनलाईन फसवणुक करणार्या एका टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने दुसर्या व्यक्तींच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत बोगस बँक खाते उघडून या खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुकचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. प्रतिक राजकुमार कटारिया, शुभम उमाशंकर सिंह आणि दिनेश अनिल चव्हाण अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मुंबईसह मध्यप्रदेश, झारखंडचे रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक, ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा मुख्य आरोपी निर्मल पटेल असून तो मूळचा गुजरातचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच गुजरातला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी चेंबूर पोलीस ठाण्याच्या एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस हवालदार भिलारे, पोलीस शिपाई अमीत जगदाळे, काळे आदी पथक वरिष्ठांच्या आदेशावरुन भाडेकरारनामा तपासणी करत होते. चेंबूरच्या चेंबूर कॅम्प, ओल्ड बॅरेक टी/४१, रुम क्रमांक २१२६ मध्ये या पथकाला जगदीश डंगराणी यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये मोबाईल आणि लॅपटॉवर प्रतिबंधित ऑनलाईन गेम चालवून काही लोकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले होते. ते दोघेही ऑनलाईन जुगार चालवत असल्याचे उघडकीस येताच तिथे आणखीन पोलीस अधिकार्यांना बोलावण्यात आले होते. काही वेळानंतर तिथे पोलीस निरीक्षक शहाणे, सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात, राऊत, सुपेकर, करंकाळ आदी अधिकारी आले होते.
त्यांच्या समोरच पोलिसांनी रुमची तपासणी सुरु केली होती. यावेळी फ्लॅटमध्ये असलेल्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे प्रतिक कटारिया, शुभम सिंह आणि दिनेश चव्हाण असल्याचे उघडकीस आले. यातील प्रतिक कटारिया हा मध्यप्रदेशच्या भोपाळ, बैराघरच्या सिंघर चौली, शुभम सिंह हा झारखंडच्या लातेहार, कामताचा तर दिनेश चव्हाण हा चेंबूरच्या चेंबूर कॅम्पचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या बँकेचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, नोंदवही, डायरी, विविध कंपनीचे मोबाईल सिमकार्ड, डिजीटल डिव्हायसला इंटरनेट सर्व्हिस पुरविण्यासाठी टीपी लिंक कंपनीचा राऊटर आणि दोन लॅपटॉप जप्त केला आहे. त्यांच्या चौकशीत ते गुजरातचा निर्मल पटेल याच्यासाठी काम करत असल्याचे उघडकीस आले.
त्याने फेअरप्ले नावाचे भारतात प्रतिबंधित असलेले गेमिंग पॅनेल खरेदी केला होता. त्याची एक ब्रॅच चेंबूर येथून गेेमिंग पॅनेलवर वेगवेगळ्या प्रतिबंधित गेम खेळणार्या व्यक्तीकडून ऑनलाईन स्वरुपात पैसे घेऊन, जिंकलेल्या पैशांपैकी त्यांच्या विनंतीप्रमाणे पैसे देण्याचे काम करत होते. त्यासाठी या टोळीने वेगवेगळ्या बँकेत दुसर्याच व्यक्तींच्या नावाने खाते उघडले होते. याच बँक खात्यात गेमिंगचे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले जात होते.
ही टोळी भारतात प्रतिबंधित् असलेल्या फेअरप्ले ऑनलाईन गेम चालवून लोकांकडून पैसे उकाळून त्यांची फसवणुक करत होती. या टोळीचा निर्मल पटेल हा म्होरक्या असून त्यानेच या तिघांना याकामी चेंबूर येथे एक भाड्याने फ्लॅट घेऊन दिले होते. त्याच्याच सांगण्यावरुन प्रतिक आणि शुभम हे वेगवेगळ्या प्रतिबंधित गेम खेळणार्या लोकांकडून ऑनलाईन पैसे घेऊन ऑनलाईन गेम चालवत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.