मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२५
मुंबई, – बाईक अपघातात रस्ता क्रॉस करणार्या एका ४६ वर्षांच्या पादचार्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटली नाही, त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहे. अपघातानंतर बाईकस्वार केवीन सुनिल गायकवाड (२३) हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी केवीनविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कांजूरमार्ग येथील एलबीएस मार्ग, बाजीप्रभू देशपांडे गार्डन गेटसमोरील उत्तरवाहिनीवर झाला. बाबू जयराम मिसाळ हे टिटवाळा येथे राहत असून मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक पार्कसाईट पोलीस ठाण्यात आहे. शुक्रवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री साडेअकरा वाजता पोलीस ठाण्यात एक तरुण भांडुपच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलचे एमएलसी पेपर घेऊन आला होता. चौकशीदरम्यान या तरुणाचे नाव केवीन गायकवाड असल्याचे उघडकीस आले. तो भांडुप येथील टँक रोड, जमुनाबाई घराशे चाळीत राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता तो त्याच्या बाईकवरुन जात होता. ही बाईक एलबीएस मार्ग, बाजीप्रभू देशपांडे गार्डन गेटसमोरुन जात असातना त्याने एका रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याने त्याला रिक्षातून भांडुपच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही माहिती प्राप्त होताच पोलीस पथक हॉस्पिटलमध्ये रवाना झाले होते. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आल्याचे समजले.
त्या व्यक्तीचे वय अंदाजे ४६ होते. त्याच्याकडे त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडली नाही. या व्यक्तीच्या मृत्यूस केवीन गायकवाड हा जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला कायदेशीर अटक दाखवून नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.