उत्तराखंड येथून आणलेल्या हेरॉईनसह टेम्पोचालकास अटक

१.३८ कोटीचा ६९१ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२५
मुंबई, – उतराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या हेरॉईनसह एका ३२ वर्षांच्या टेम्पोचालकाला कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ६९१ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत १ कोटी ३८ लाख रुपये आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. आरोपीचा हा पहिलाच गुन्हा असून पहिल्याच प्रयत्नात तो पकडला गेल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्री केली जात होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना उत्तराखंड येथून काहीजण हेरॉईन घेऊन येणार असून या हेरॉईनची बोरिवली परिसरात डिलीव्हरी होणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक निखिल शेळके, अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार देसाई, खरात, हर्षद राणे, रोकडे, चौधरी, पोलीस शिपाई अरुण राठोड आदी पथकाने बोरिवलीतील खोदीयार नगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

मंगळवारी दुपारी तिथे आरोपी आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना ६९१ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत १ कोटी ३८ लाख २० हजार रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी कांदिवली युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.

३२ वर्षांचा आरोपी हा व्यवसायाने टेम्पोचालक असून मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी आहे. हेरॉईन घेऊन तो उत्तराखंड येथून मुंबईत विक्रीसाठी आला होता, मात्र त्याची विक्री करण्यापूर्वीच तो पकडला गेला. हा त्याचा पहिलाच प्रयत्न असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहेत, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१.०७ कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह तरुणाला अटक
दुसर्‍या कारवाईत आझाद मैदान युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने एका तरुणाला अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी तीन किलो साठ ग्रम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत एक कोटी सात लाख रुपये इतकी आहे. खार येथील १९ रोड, तेरावा क्रॉसजवळ काहीजण हायड्रोपोनिक गांजाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटला मिळाली होती. या माहितीनंतरसहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर घाडगे, राम लिंगे, पोलीस हवालदार पाटील, प्रभू, पोलीस शिपाई भोसले, सिंह आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलिसांना एक कोटी सात लाखांचा तीन किलो साठ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page