एलआयसीच्या अधिकार्याच्या घरातील २५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
चोरीनंतर उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२५
मुंबई, – वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहणार्या एलआयसीच्या अधिकार्याच्या घरी झालेल्या २५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. चोरीनंतर उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. फैजल जुल्फिकार अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५७ वर्षाचे अर्जुन जयराम सावंत हे वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या १७७/५ मध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. ते वांद्रे येथील एलआयसीमध्ये हेड क्लार्क तर त्यांची पत्नी अनुजा सावंत ही बीकेसीच्या पे ऍण्ड अकाऊंट विभागात लेखाधिकारी म्हणून कामाला आहे. त्यांचा लहान मुलगा स्पेशल चाईल्ड असून त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार सुरु आहेत तर दुसरा मुलगा माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये शिकतो. १५ सप्टेंबरला ते त्यांच्या लहान मुलासोबत उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये गेले होते. सव्वानऊ वाजता घरातून निघून गेल्यानंतर ते दुपारी पाऊणच्या सुमारास घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घराला लावलेले कुलूप व कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी आत जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
अज्ञात व्यक्तीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती खेरवाडी पोलिसांना दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. हा तपास सुरु असताना तक्रारदारांना त्यांच्या घरातून आणखीन मुद्देमाल चोरी गेल्याचे दिसून आले. सुमारे २५ लाखांची घरफोडी झाली होती. त्यामुळे त्यांनी पुरवणी जबानीत चोरी झालेल्या मुद्देमालाची माहिती पोलिसांना दिली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत खेरवाडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
या फुटेजची पाहणी केल्यानंतर एका आरोपीची ओळख पटली होती. त्याची माहिती काढताना तो त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर खेरवाडी पोलिसांचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने फैजल अन्सारीला त्याच्या गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.