डिजीटल अटकेची भीती दाखवून निवृत्त शिक्षिकेची ८९ लाखांची फसवणुक
फ्लॅटवर २३ लाखांचे पर्सनल लोन घेण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – डिजीटल अटकेची भीती दाखवून एका महानगरपालिकेच्या शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षिकेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे ८९ लाखांची फसवणुक केल्याची घटना चुन्नाभट्टी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खंडणीसवह फसवणुक तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चंद्रभान सिंग नावाच्या तोतया एनआयए अधिकार्याचा पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांकडून शोध सुरु आहे. या ठगाने तक्रारदार महिलेला तिच्या राहत्या घरावर सुमारे २३ लाखांचे पर्सनल लोन घेण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मंदा शैलेंद्र सोनकुसरे या ६१ वर्षांच्या वयोवृद्ध महिला चुन्नाभट्टी येथे राहतात. त्या कुर्ला येथील नेहरुनगर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. २०१७ साली त्या निवृत्त झाल्या असून सध्या घरी असतात. त्यांना पेंशन मिळत असून त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. १२ ऑगस्टला सकाळी आठ वाजता तयंना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव चंद्रभान सिंग सांगून तो राष्ट्रीय तपास यंत्रणा (एएनआय) मधून बोलत असल्याचे सांगिलते. त्यांच्या आधारकार्डचा वापर करुन एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या बँक खात्यात २ कोटी ५५ लाख रपुये जमा झाले आहे.
आसिफ फौजी या दहशतवाद्याने त्यांच्या नावाने ही फसवणुक केली आहे. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याने त्यांच्याावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे अटकेची ऑर्डर कॉपी व्हॉटअवर पाठविली होती. या घटनेने त्या प्रचंड घाबरल्या होत्या. यावेळी चंद्रभान सिंगने त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन त्यांना पुन्हा संपर्क साधतो असे सांगून याबाबत कोणाशीही चर्चा करु नका असे सांगितले. १३ ऑगस्टला चंद्रभानने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांची चौकशी सुरु केली होती.
त्यांच्या बँक खात्यासह इतर गुंतवणुकीबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची एफडी मोडून ती सर्व रक्कम बँक खात्यात जमा करुन त्यांना एक बँक खात्याची माहिती दिली होती. ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा करा. चौकशी पूर्ण होताच, त्यांना क्लिनचीट मिळाल्यानंतर ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करु अशी धमकी दिली होती. अटकेच्या भीतीपोटी त्यांनी त्यांच्या तिन्ही बँक खात्यात जमा असलेली ५३ लाखांची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली. त्यांच्याकडून दागिन्यांची विक्री करुन त्यातून त्यांना तीन लाख सत्तर हजार रुपये मिळाले होते. ती रक्कमही त्यांनी संबंधित खात्यात ट्रान्स्फर केली होती.
चंद्रभानने त्यांच्या राहत्या घराची विक्री करुन त्यातून येणारी रक्कमही तिला जमा करण्यास सांगितले. तिने घराची विक्री करण्यास नकार दिला, मात्र तिच्या फ्लॅटवर तिने एका खाजगी बँकेतून २३ लाखांचे पर्सनल लोन काढले होते. ही रक्कम बँक खात्यात जमा होताच तिने ती रक्कम संबंधित खात्यात जमा केली होती. अशा प्रकारे तिने ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत चंद्रभान सिंग याच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे ८९ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तो तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. तिच्या जिवाची धोका असल्याचे सांगून तिला घराबाहेर पडू नका असे सांगत होता.
याच दरम्यान तिच्या विवाहीत मुलीचा तिच्या विचारपूस करण्यासाठी कॉल आला होता. यावेळी तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. तिच्याकडून ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. तिने तिची डिजीटल ऑनलाईन फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सायबर पोर्टल हेल्पलाईन क्रमांकासह पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना सांगून संबंधित् व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चंद्रभान सिंग नावाच्या तोतया एनआयए अधिकार्याविरुद्ध तोतयागिरी करुन खंडणीसह फसवणुक तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम ट्रान्स्फर झालेल्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.