टास्कच्या माध्यमातून महिलेला गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

गुन्हा दाखल होताच तीन महिन्यानंतर अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – टास्कच्या माध्यमातून परताव्याचे आमिष दाखवून महिलेला गंडा घालणार्‍या साद सोहेल चव्हाण नावाच्या एका आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तीन महिन्यानंतर साद चव्हाणवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी कटातील मुख्य आरोपींना बँक खाती पुरविल्याचा सादवर आरोप आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

३२ वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या पिंपरीपाडा परिसरात राहते. तिच्यासह तिचे पती वेगवेगळ्या खाजगी कंपनीत कामाला आहेत. २ जूनला तिला प्रिती शर्मा नाव सांगणार्‍या एका महिलेचा मॅसेज आला होता. तिने नायका कंपनीच्या उत्पादनांना रेटींग देण्याचे आणि ते कार्टमध्ये ऍड करण्याचे पार्टटाईम कामाची ऑफर दिली होती. या टास्कच्या माध्यमातून दिवसाला तीन ते पाच हजाराचे कमिशन मिळेल असे सागितले होते. तिचा विश्‍वास बसवा म्हणून तिने तिला एक टास्क दिला होता. हा टास्क तिने पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात दोनशे रुपये जमा झाले होते. त्यामुळे तिला तिच्यावर विश्‍वास बसला होता.

टास्कसाठी तिने होकार दर्शविल्यानंतर प्रितीसह तिच्या सहकार्‍याने तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये त्यांनी तिला विविध टास्क दिले होते. तिने ते सर्व टास्क पूर्ण केले. सुरुवातीचे सर्व टास्क प्रिपेड होते, नंतर तिला पेड टास्क देण्यात आले होते. या टास्कच्या माध्यमातून तिला जास्त कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने एक हजार रुपये भरुन पहिला टास्क पूर्ण केला. या टास्कनंतर तिच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले होते. अशा प्रकार या आरोपींनी तिला विविध टास्कसाठी पैसे भरण्यास सांगिेतले.

त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिनेही वेगवेगळ्या टास्कसाठी ३ लाख ९३ हजार ७४० रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम न देता या आरोपींनी तिची फसवणुक केली होती. चांगले कमिशन देतो असे सांगून विविध टास्कद्वारे तिची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे लक्षात येताच तिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांचा कुरार पोलिसांकडून तपास सुरु होता. आरोपींचा शोध सुरु असताना पोलिसांनी साद चव्हाण याला ताब्यात घेतले होते. तपासात फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याने फसवणुक करणार्‍या आरोपींना मदत केल्याचे तसेच त्यांना बँक खाते पुरविल्याचे उघडकीस आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page