पेंशन कार्ड देतो सांगून वयोवृद्धाची १०.३९ लाखांची फसवचणुक

बोगस एपीके फाईल पाठविणार्‍या अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, दि. ज्येष्ठ नागरिक असल्याची बतावणी करुन निवृत्ती वेतन म्हणजेच पेंशन कार्डसाठी पात्र असल्याचे सांगून एका ७६ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने १० लाख ३९ हजाराची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्धाच्या व्यापारी मुलाच्या तक्रारीवरुन पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हाा दाखल करण्यात आला आहे. एपीके फाईल ओपन करण्शास प्रवृत्त करुन काही क्षणातच या ठगाने त्यांच्या बँक खात्यावरुन या रक्कमेवर डल्ला मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

निरव नरेंद्र मेहता हे व्यवसायाने व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची स्वतची एक खाजगी स्टिल कंपनी असून ही कंपनी विविध दुकानात स्टिल साहित्य सप्लाय करण्याचे काम करते. नरेंद्र मेहता हे त्यांचे वडिल असून २७ सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका व्यक्तीने कॉल करुन तो एका खाजगी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. ते ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतन पेंशन कार्डसाठी पात्र आहेत. कार्ड मिळविण्यासाठी त्याने त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्यासंबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो बँक अधिकारी समजून त्यांनीही त्याला आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासपोर्टसह डेबीट कार्डचा फोटो आदी माहिती दिली होती. त्यानंतर त्याने त्यांना फाईल पाठवून एपीके फाईल ओपन करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी ती फाईल ओपन केली.

ही फाईल ओपन होताच त्यांच्या वहिनीच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये डेबीट झाले. ते खाते त्यांच्यासह त्यांच्या वहिनीचे संयुक्त खाते होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कस्टमर केअरला कॉल करुन पेमेंट करण्याची सर्व प्रक्रिया बंद करण्याची विनंती केली होती. यावेळी कस्टमर केअरने त्यांच्या बँक खात्यातून चार लाखांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे सांगितले. दुसर्‍या दिवशी त्यांना त्यांच्या बँक खात्यातून आणखीन काही व्यवहार झाल्याचे दिसून आले. खात्याची शिल्लक रक्कमेची पाहणी केल्यानंतर १० लाख ३९ हजार रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.

पेंशन कार्डसाठी माहिती घेऊन अज्ञात सायबर ठगाने तक्रारदाराच्या वडिलांकडून बँक खात्याची माहिती जाणून घेऊन ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० आणि पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्घ फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page