वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

गळा आवळून हत्या करुन मारेकर्‍याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – अंधेरीतील वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर एका ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गोणीत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या व्यक्तीची गळा आवळून हत्या करुन अज्ञात मारेकर्‍याने हत्येचा पुरावा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून अज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दरम्यान या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.

गुरुवारी १ ऑक्टोंबरला सकाळी पावणेनऊ वाजता एका व्यक्तीला अंधेरीतील जे. पी रोड, वर्सोवा, हिंदू स्मशानभूमीमागील ससुद्रकिनार्‍यावर एक गोणी दिसली होती. या गोणीतून दुर्गंध येत असल्याने त्याला संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली. ही माहिती प्राप्त होताच वर्सोवा पोलिसांचे एक पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यात त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्याच्या गळ्यावर काही जखमा दिसून आले. प्राथमिक तपासात त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्याचे दोन्ही हातपाय बांधून त्याचा मृतदेह गोणीत भरुन तिथे टाकून मारेकर्‍याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह नंतर कूपर हॉस्पिटलमधश्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० असून त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. त्याचा फोटो मुंबईसह आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत या वयोगटातील कोणीही व्यक्ती मिसिंग आहे, त्याची मिसिंग तक्रार झाली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

याप्रकरणी दिपक भास्कर निकाळजे यांच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वर्सोवा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर या हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुरुवारी सकाळी एका गोणीत मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page