भरघोस परताव्या आमिषाने शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा
कंपनीच्या ग्रुप ऍडमिनसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर हमखास भरघोस परवाव्याच्या आमिषाने गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे पावणेपंधरा लाखांची फसवणुक केल्याचा चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खाजगी कंपनीच्या ग्रुप ऍडमिनसह तीन सायबर इगाविरुद्ध पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
७५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार चेंबूरच्या छेडानगर परिसरात राहत असून ते माझगाव डॉक लिमिटेड कंपनीतून निवृत्त झाले आहेत. मे २०२६ रोजी घरी फेसबुकवर पाहत असताना त्यांना शेअरमार्केटसंदर्भातील एक जाहिरात दिसली होती. त्याखाली एक लिंक असल्याने त्यांनी ती लिंक ओपन केली होती. या लिंकनंतर ते एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड झाले होते. या ग्रुपमध्ये शेअरमार्केटसंदर्भात प्रशिक्षण देण्याचे, कुठल्या शेअरवर गुंतवणुक केल्यास किती फायदा होईल, शेअरमध्ये अशा प्रकारे गुंतवणुक करावी याबाबत माहितीसह मार्गदर्शन केले जात होते. याच दरम्यान त्यांना ग्रुप ऍडमिनसह इतर दोघांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना या गुंतवणुकीवर त्यांना जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
त्यांच्याकडे त्यांची काही रक्कम सेव्हींगमध्ये होती, त्यामुळे त्यांनी ती रक्कम शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत ग्रुप ऍडमिनला होकार दर्शविल्यानंतर त्यांनी त्यांना एक ट्रेडिंग ऍपची माहिती दिली. या ऍपच्या माध्यमातून त्यांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी ऍपवरुन वेगवेगळ्या शेअरमध्ये १४ लाख ७५ हजार ६१२ रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिट म्हणून ६५ लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला,
मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना ती रक्कम बँंक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी ग्रुप ऍडमिनसह इतर दोन्ही कर्मचारी त्यांना आणखीन दहा लाख रुपये भरण्यास सांगत होते. ही रक्कम जमा केल्याशिवाय त्यांना त्यांची रक्कम ट्रान्स्फर करता येणार नाही असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ऑनलाईन सायबर पोर्टलवर हा प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी पूर्व सायबर सेल विभागात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ग्रुप ऍडमिनसह इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ही रक्कम ट्रान्स्फर केलेल्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.