सॅम्पल फ्लॅट दाखवून १८ लाखांची फसवणुकप्रकरणी गुन्हा दाखल

तीन आरोपींमध्ये मायलेकीसह म्हाडा ब्रोकरचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – म्हाडाचा सॅम्पल फ्लॅट दाखवून दोन बंधूंची एका त्रिकुटाने सुमारे १८ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाणयत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका मायलेकीसह म्हाडा ब्रोकरचा समावेश आहे. ऋतुजा जयेश मोडक, रुनाली विनित पवार आणि इबाहिम शेख अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपीची चौकशी होणार असून चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई ाहेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय सखाराम चव्हाण हा त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथे राहतो. तो त्याच्या भावासोबत एका सलुन दुकानात तर त्याचा दुसरा भाऊ सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गेल्या सहा वर्षांपासून दादरच्या एका सलुनमध्ये काम करत असताना त्याची रुनाली पवारशी ओळख झाली होती. ती सलूनमध्ये शिकण्यासाठी येत होती. शिवडी येथे राहणार्‍या रुनालीचा लेडीज पार्लर आहे. संजय हा त्यांच्या दोन भावासोबत एकत्र राहत असल्याने त्यांना एका रुमची गरज होती. याबाबत त्याने रुनालीला आणि तिने तिची म्हाडा ब्रोकर असलेली आई ऋतुजा हिला ही माहिती सांगितली होती. तसेच त्याच्यासाठी एक स्वस्तात रुम असेल तर सांगण्यास सांगितले होते.

काही दिवसांनी ती त्याच्या दुकानात आली होती. यावेळी तिने काळाचौकी येथील दिनशा पेटीट मार्ग, चव्हाण मसालेजवळील वेस्टर्न हाईट्स सहकारी सोसायटीमध्ये म्हाडा एक रुम आहे. या रुमची किंमत तीस लाख रुपये असल्याचे सांगून रुमवर लोन करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान तिने संजयसह त्याच्या भावाला म्हाडाचा एक सॅम्पल फ्लॅट दाखविला होता. फ्लॅट आवडल्योन त्यांनी तोच फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी घरातील सोने आणि कॅश जमा करुन उर्वरित रक्कम लोन यातून जमा करण्याचा ठरविले होते.

ठरल्याप्रमाणे त्यांनी ऋतुजाला फ्लॅटसाठी नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत १८ लाख १० हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर तिने त्यांना म्हाडाची पावती देते असे सांगितले, मात्र तिने वारंवार विचारणा करुनही म्हाडाची पेमेंट भरल्याची पावती दिली नाही. तीन महिन्यांत रुमचा ताबा देते असे सांगून तिने रुमचाही ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने रुमचा ताबा द्या नाहीतर रुमसाठी घेतलेले पैसे परत करा असा तगादा लावला होता. यावेळी ऋतुजाने त्यांना एक धनादेश दिला होता, मात्र तो धनादेश बँकेत न वटता परत आला होता.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्याने शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रुनाली आणि ऋतुजा यांची पोलिसांनी चौकशी केली होती. त्यात या दोन्ही मायलेकींनी रुमसाठी घेतलेली रक्कम म्हाडा ब्रोकर इब्राहिम शेख याला दिल्याची कबुली दिली होती. त्यानेच रुमचा ताबा न देता रुमसाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याचे सांगितले. या चौकशीनंतर इब्राहिम शेख, रुनाली पवार आणि त्रतुजा मोडक या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटातील मुख्य आरोपी इब्राहिम असून त्यानेच अशाच प्रकारे म्हाडाच्या रुमसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page