पैशांच्या पावसासह विविध आमिष दाखवून वयोवृद्धाची फसवणुक
३१ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड भामट्यांना अटक
अरुण सावरटकर
२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पैशांच्या पावसासह विविध आमिष दाखवून एका ६० वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे ३१ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन वॉण्टेड भामट्यांना अखेर कांदिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. भवरलाल देवाराम पालीवल आणि गौरीशंकर नारायणलालजी शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांनी एक्सरे चष्मा देण्याचे, जमिनीवरील खजिना काढण्यसाठी पूजा करण्यासाठी तसेच पैशांचा पाऊस करण्यासाठी वयोवृद्धाकडून टप्याटप्याने ३१ लाख रुपये घेऊन कुठलाही परतावा न देता ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ललित चेलाराम देवासी हे कांदिवलीतील पसिरात राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. मूळचे राजस्थानचे रहिवाशी असल्याने ते अधूनमधून त्यांच्या गावी जात होते. भवरलाल हा त्यांच्या गावचा रहिवाशी असून ते दोघेही एकमेकांना गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखतात. दहा वर्षांपूर्वी त्याने त्यांची ओळख गौरीशंकरशी करुन दिली होती. तो जोगेश्वरीतील प्रतापनगर परिसरात राहत होता. तिथेच त्याच्या मालकीचे मेडीकल शॉप होते, तो रारजस्थानचा रहिवाशी असल्याने काही दिवसांत ललित देवासी यांची गौरीशंकरसोबत चांगली मैत्री झाली होती. त्याने त्यांना त्याच्याकडे एक एक्सरे चष्मा असून या चष्मातून जमिनीच्या आतील वस्तू दिसतात. या चष्मासाठी त्याने त्यांच्याकडून तीन लाख रुपपये घेतले होते.
या चष्माची इतर व्यक्तींना जास्त किंमतीत विक्री करुन आपण फायदा कमवू असे सांगितले होते. मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना चष्मा आणून दिला नाही. काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी सहा लाख रुपये घेतले होते.ही रक्कमही त्याने दिलेल्या मुदतीत परत केली नाही. मार्च २०१९ रोजी भवरलाल आणि गौरीशंकर यांनी त्यांना त्यांच्या गावातील घरी जमिनीत लाखो रुपयांचा खजिना पुरला असून या खजिन्याच्या शोध घेण्यासाठी त्याला घरी पूजा करावी लागणार आहे. या पूजेसाठी त्यांनी त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते. जमिनीतून खजिना काढून त्यांनी त्यांना काही हिस्सा देण्याचे कबुल केले होते. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. त्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून त्यांच्याकडून पैसे उकाळत होते.
ऑगस्ट २०२३ रोजी भवरलालने तयंना भेटून गौरीशंकर हा त्याच्या घरी पैशांचा पाऊस पाडणार आहे. त्यातून त्याचे सर्व पैसे परत करणार आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे शेवटचे पंधरा लाखांची मागणी केली होती. पालघर येथे एक गाळा घेऊन तिथे पैशांचा पाऊस पाडणार असल्याचे सांगून त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यावेळेस हमखास काम होणार असून त्यातून आपण तिघेही मालामाल होऊ असा विश्वास दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा विश्वस बसावा म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत एक करार केला होता. काही दिवसांनी त्यांनी पाऊस पडत असल्याचा, ते दोघेही जमिनीवर पडलेले पैसे मोजत असल्याचा फोटो त्यांना व्हॉटअपवर पाठविले होते, मात्र पैशांचा पाऊस कधी झाला, त्यातून त्यांना त्यांचा हिस्सा का देत नाही याबाबत विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
मे २०१८ ते एप्रिल २०२६ या कालावधीत भवरलाल पालीवल आणि गौरीशंकर शर्मा यांनी त्यांच्याकडून एक्सरे चष्मा, जमिनीतील खजिना शोधून काढणे, पूजा करणे, पैशांचा पाऊस पाडतो, कर्जाची परतफेडीसह इतर वेगवेगळ्या कामासाठी सुमारे ३१ लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना कुठलाही परतावा किंवा खजिना-एक्सरे चष्मा दिला नाही. त्यांची मूळ रक्कमही परत केली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. त्यांनी दिलेले ९ लाख ८२ हजार व १५ लाख ५० हजाराचे दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एप्रिल २०२६ रोजी या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या आठवड्यात भवरलाल पालीवल आणि गौरीशंकर शर्मा या दोन्ही आरोपी भामट्यांना कांदिवली पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. चौकशीत त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने वेगवेगळे आमिष दाखवून तक्रारदारांची सुमारे ३१ लाखांची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.