पोलीस पत्नीच्या सोनसाखळीची चोरी करणार्‍या दुकलीस अटक

चार गुन्ह्यांची उकल करुन पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पळून जाणार्‍या दुकलीस पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. शुभम सुखराम चौधरी आणि अजय ऊर्फ डब्लू मुन्नीलाल गुप्ता अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ऍण्टॉप हिलचे रहिवाशी आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील पावणेसहा लाखांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे.

विमल बिरु गोरे ही महिला विक्रोळी परिसरात राहते असून तिचे पती बिरु गोरे हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. तिचे दाजी चंद्रकांत तुकाराम लवंटे हे कोचीच्या कोटमंगलम परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी त्यांच्याच ज्चेलर्स शॉपमधून तिने तीन लाखांचा २२ ग्रॅम वजनाचे एक मंगळसूत्र घेतले होते. २७ सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता जेवण झाल्यानंतर विमल ही तिच्या मुलीसोबत घराजवळ वॉकसाठी गेली होती. रात्री दहा वाजता विक्रोळीतील एलबीएस मार्ग, सूर्यानगरकडे जाणार्‍या उत्तर वाहिनीवरुन जाताना एका अज्ञात तरुणाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.

तिने प्रतिकार केला असता त्याने तिला जोरात धक्का बसला होता. गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ते दोघेही बाईकवरुन पळू लागले. यावेळी तिच्या मुलीने जोरजोरात चोर चोर असा आरडाओरड केल्यानंतर तिथे उपस्थित लोकांसह गस्त घालणार्‍या पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांची बाईक स्लीप झाली आणि ते दोघेही खाली पडले. यावेळी या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात त्यांची नावे शुभम चौधरी आणि अजय गुप्ता असल्याचे उघडकीस आले.

ते दोघेही ऍण्टॉप हिल परिसरात राहत असून बाईकवरुन सोनसाखळी चोरी करणार्‍या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे. त्यांच्या अटकेने भांडुप, पार्कसाईट, घाटकोपर पोलीस ठाण्यातील चार सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत ५ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस निरीक्षक अशोक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, अतुल ठोंबरे, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय वाघ, वाल्मिक शिंदे, सहाय्यक फौजदार नूरलहसन मोमीन, पोलीस हवालदार राहुल ढोले, विशाल गवारे, राहुल नवले, सुनिल बोरसे, पोलीस शिपाई व्रिम कोल्हे, मनोज सुरवाडे, रोहिदास भुसारी, अनिल उंडे, दिपक तायडे, दिपक निकम आदी पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page