शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त शासकीय अधिकार्‍याची फसवणुक

५.१० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोन आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शासनाच्या आरोग्य विभागातून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाची शेअर गुंतवणुकीच्या नावाने ५ कोटी १० लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये मोहम्मद अशरफ आलम इम्रान करमतअलीसह त्याच्या सहकार्‍याचा समावेश आहे. या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

८७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जॉन जोसेफ डांथी हे मालाड परिसरात राहत असून ते शासनाच्या आरोग्य विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे एक डिमेंट खाते असून या खात्यातून ते शेअरमध्ये गुंतवणुक करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून शेअरमध्ये गुंतवणुक करत असल्याने त्यांना शेअरबाबत चांगले ज्ञान होते. जुलै २०२६ रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना सोनल जग्ननाथ नाईक नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने त्यांना शेअर ट्रेडिंगबाबत इंटरेस्टेड आहात का अशी विचारणा केली, त्यांनी होकार दर्शविताच तिने एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये पंधरा सभासद होते, त्यात शेअरबाबत दैनदिन माहितीसह कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास किती फायदा होईल याची माहिती दिली जात होती.

तिने त्यांना कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणकीचा सल्ला दिला होता. यावेळी तिने त्यांना चांगला देण्याचे आश्‍वासन दिले ाहेते. तिच्यावर विश्‍वास ठेवून ठेवून विविध शेअरमध्ये ५ कोटी १० लाख ३४ हजार ६७१ रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिट मिळून ३२ कोटी ५ लाख ५५ हजार १९६ रुपयांचा फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यातील काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना ती रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. उलट त्यांना आयपीओ खरेदीसाठी आणखीन पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. त्यांनी अतिरिक्त रक्कम भरण्यास नकार देत त्यांच्या प्रॉफिटमधून ही रक्कम वजा करण्यास सांगितले.

यावेळी त्यांनी दहा टक्के कमिशनची रक्कम भरल्याशिवाय त्यांना त्यांची रक्कम ट्रान्स्फर करता येणार नाही असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर क्राईम पोर्टलसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यात येत होती. त्यात मोहम्मद अशरफ याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अंधेरी येथून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे, ती रक्कम त्याने कटातील मुख्य आरोपींना ट्रान्स्फर केल्याची तसेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत त्याच्या अन्य एक सहकार्‍याचे नाव समोर आले होते. त्याला नंतर अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टान त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page